Wed, Mar 27, 2019 00:02होमपेज › Pune › भाजप, राष्ट्रवादीत ‘तुझे माझे जमेना’ अवस्था 

भाजप, राष्ट्रवादीत ‘तुझे माझे जमेना’ अवस्था 

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMवडगाव मावळ :  गणेश विनोदे

वडगाव नगरपंचायतच्या नुकत्याच झालेल्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत ‘त्रिशंकू’ परिस्थितीत निर्माण झाल्याने सत्तेचे गणित बांधताना ‘तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना’ अशी गत तीनही गटांची झाली आहे.

नव्याने स्थापन झालेल्या वडगाव नगरपंचायतची प्रथम सार्वत्रिक निवडणूक नुकतीच चुरशीच्या वातावरणात पार पडली. ही निवडणूक भाजप स्वबळावर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लीकन व अपक्ष पुरस्कृत श्री पोटोबा महाराज आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष पुरस्कृत वडगाव कातवी नगरविकास समिती अशी तिरंगी झाली. या निवडणुकीत वडगाव कातवी नगरविकास समितीचे मयूर ढोरे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत विजयश्री खेचून आणली असून पॅनेलमधील राष्ट्रवादीच्या चिन्हावर 3 व अपक्ष 1 असे चार नगरसेवक विजयी झाले आहेत.

भाजपच्या पॅनेलमधील पाच जण विजयी झाले आहेत, तर पोटोबा महाराज आघाडीतील राष्ट्रवादीच्या चिन्हावरील 4 व भाजपच्या चिन्हावरील 2 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे पॅनेलच्या दृष्टीने पहिल्यास भाजप 5, पोटोबा महाराज आघाडी 6 व वडगाव कातवी नगरविकास समिती 4 असे त्रिशंकू संख्याबळ असून 1 भाजप बंडखोर अपक्ष तर, 1 मनसेचा नगरसेवक असे संख्याबळ आहे.निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्याचा प्रयत्न झाला परंतु, ते शक्य न झाल्याने या दोन्ही गटाच्या भाजपबरोबर सत्ता स्थापनेच्या द‍ृष्टीने हालचाली सुरू झाल्या; परंतु पक्षांतरबंदी कायदा, गटनोंदणीची अडचण निर्माण होत असल्याने इच्छा असूनही भाजप व राष्ट्रवादीचा एक गट अशी सत्ता स्थापन करण्यात अडचण निर्माण झाली.

त्यामुळे दोन्ही प्रमुख पक्षांनी चिन्हानुसार एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला 9 चा आकडा गाठता येत नसल्याने सत्ता स्थापन करताना तुझं माझं जमेना अन् तुझ्या वाचून करमेना अशी स्थिती सर्वांचीच झाली असल्याचे पहावयास मिळते.

.. तर अपक्ष व मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार

पॅनेल बाजूला ठेवून चिन्हानुसार विचार केला तरी राष्ट्रवादीच्या चिन्हावर 7 व भाजपच्या चिन्हावर 7 नगरसेवक विजयी झाले असून, दोन्ही पक्षाचे प्रत्येकी एक-एक बंडखोर अपक्ष विजयी झाला आहे. तर एक नगरसेवक मनसेच्या चिन्हावर विजयी झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपचे संख्याबळ  समसमान होत असल्याने दोन्ही पक्षांना सत्ता स्थापन करताना अपक्ष व मनसेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

उपनगराध्यक्षपद कोणाच्या पारड्यात?

आठवडाभरात उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक होण्याची शक्यता असून त्रिशंकू परिस्थितीत सत्ता स्थापनेची अडचण झाली असून सत्तेसाठी आवश्यक असणारी ‘मॅजिक फिगर’ कोण गाठणार व उपनगराध्यक्षपद आता कोणाच्या पारड्यात जाणार याची उत्सुकता वडगावकरांना लागली आहे.    

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीलाही अडचण

दरम्यान, भाजपचे स्वत:चे 5 व पोटोबा महाराज आघाडीत 2 नगरसेवक आहेत, स्वीकृत नगरसेवक पदासाठी या 7 जणांना एकत्र येऊन गट स्थापन करावा लागणार आहे; तसेच राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक पोटोबा महाराज आघाडीत तर, 3 नगरसेवक वडगाव कातवी नगरविकास समितीमध्ये आहेत. राष्ट्रवादीचा गट स्थापन करण्यासाठी दोन्ही गटातील नगरसेवकांनी एकत्र येणे आवश्यक आहे; परंतु गटातटाचे राजकारण अडसर ठरत असल्याने राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवकपद सध्यातरी अडचणीत सापडले आहे.