होमपेज › Pune › आघाडीत बिघाडी, नव्या आघाडीचा झाला उदय !

आघाडीत बिघाडी, नव्या आघाडीचा झाला उदय !

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:22AMवडगाव मावळः वार्ताहर 

वडगाव नगरपंचायत निवडणूकीसाठी काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या आघाडी अखेर बिघाडी होऊन आज नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लीकन पार्टी व अपक्ष पुरस्कृत श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडीचा उदय झाला असल्याने या निवडणूकीला आता मोठी राजकीय कलाटणी मिळण्याचे संकेत निर्माण झाले आहेत.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये आघाडीची घोषणा करुन नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून पंढरीनाथ ढोरे यांच्या नावाची घोषणा केली, यावेळी, सुभाषराव जाधव, गंगाराम ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुनिल चव्हाण, बारकू ढोरे, सुनिल ढोरे, विलास दंडेल, बाळासाहेब दौंडे, पोपटराव वहिले, नंदकुमार चव्हाण, अरुण निकम, अविनाश चव्हाण, सुरेश कुडे, चंद्रकांत राऊत, बंडोपंत निकम, रामभाऊ ढोरे, बाळासाहेब निकम आदि उपस्थित होते. निवडणूक जाहिर झाल्यानंतर काँग्रेस, शिवसेना व अपक्षांसह निवडणूक लढण्याचा निर्णय झाला होता, तर भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळाची तयारी केली होती. दरम्यानच्या काळात काँग्रेसचे क्रियाशील कार्यकर्ते पंढरीनाथ ढोरे यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षांची मूठ बांधून आघाडीच्या माध्यमातून भाजपाला सामोरे जाण्याचा निर्णय झाला होता.

परंतु, आघाडीमध्ये काही जागा व अन्य काही बाबींबाबत एकमत होत नसल्याने तसेच आघाडीचे उमेदवार म्हणून जाहिर झालेले मयूर ढोरे यांच्यासह सुनिल ढोरे यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आघाडीबाबत अजूनही संभ्रमावस्था होती. 

दरम्यानच्या काळात भाजपामध्ये नव्याने दाखल झालेले पंढरीनाथ ढोरे हे नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेमध्ये अखेरपर्यंत असताना अचानकपणे पक्षाने भास्करराव म्हाळसकर यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे नाराज झालेल्या ढोरे यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला होता.यानंतर खर्‍या अर्थाने राजकीय घडामोडींना वेग आला आणि आज या घडामोडीतून पहिल्या आघाडीची बिघाडी होवून राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लीकन पार्टी व अपक्षांची श्री पोटोबा महाराज नगरविकास आघाडी या नावाने नवी आघाडी उदयास आली, यामध्ये पंढरीनाथ ढोरे समर्थक भाजपाच्या उमेदवारांचा समावेश आहे.