Sat, Feb 16, 2019 14:59होमपेज › Pune › २ हजार ४१८ गर्भवतींना स्वाईन फ्लूचे लसीकरण

२ हजार ४१८ गर्भवतींना स्वाईन फ्लूचे लसीकरण

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 10:53PMपिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची  आठही रुग्णालये आणि दवाखाने या ठिकाणी स्वाईन फ्लू लस प्रतिबंधक उपाय म्हणून गर्भवती आणि असाध्य रोग असलेल्या रुग्णांना मोफत स्वाईन फ्लूच्या लसीकरणाची सुविधा उपलब्ध आहे. जानेवारी 2018 ते 13 मार्चपर्यंत 2,418 गर्भवती आणि 258 असाध्य आजार असलेल्या रुग्णांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी ही माहिती दिली. स्वाईन फ्लूचा सर्वाधिक धोका गर्भवतींना असतो.  खबरदारीचा उपाय म्हणून गरोदर महिला आणि अतिजोखमीच्या रुग्णांसाठी मोफत लसीकरणाची सुविधा पालिकेच्या सर्व रुग्णालयांत करण्यात आली आहे. 

गर्भवती महिलांची प्रतिकारशक्ती शरीरात होणार्‍या हार्मोन्सशी संबंधित बदलांमुळे कमकुवत होते. खास करून गरोदरपणातील तिसरा टप्पा म्हणजेच 27 ते 40 व्या आठवड्यादरम्यान त्यांनी जास्त काळजी घेण्याची गरज असते.  फुफ्फुस, किडनी किंवा हृदयविकार, मेंदूशी संबंधित (न्यूरोलॉजिकल) आजार आणि मधुमेह इत्यादी रुग्ण, गर्दीच्या ठिकाणी सातत्याने काम करणार्‍या लोकांनीही सावधगिरीचा उपाय म्हणून स्वाईन फ्लूचे लसीकरण करावे, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून केले जाते.   

तसेच, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार किंवा इतर कोणतेही गंभीर फुफ्फुसाचे आजार या आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना स्वाईन फ्लूचा धोका असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी देखील लसीकरणाला अधिक महत्त्व दिले पाहिजे.