Mon, Jun 17, 2019 19:04होमपेज › Pune › शालेय पुस्तकांची वापराअभावी रद्दी

शालेय पुस्तकांची वापराअभावी रद्दी

Published On: May 17 2018 1:25AM | Last Updated: May 17 2018 12:17AMपिंपरी : वर्षा कांबळे 

शालेय परीक्षांचा निकाल कधीच लागला आहे. आता एका इयत्तेतून दुसर्‍या इयत्तेत जाणार्‍या पाल्याची चांगली पुस्तके कोणाला द्यायची हा प्रश्‍न पालकांना पडत आहे. शहरांमध्ये प्रत्येक वर्षाला नवी पुस्तके घेण्याला प्राधान्य असते. आजच्या पालकांना तसे परवडते. त्यामुळे शहरांमध्ये जुनी शालेय पुस्तके घरी कुणाला लागली तरच वापरली जातात. अन्यथा त्या पुस्तकांची रद्दी होते. अशी शैक्षणिक पुस्तके रद्दीत जाण्यापूर्वी एखादा शालेय पुस्तक दान उपक्रम राबविला तर त्याचा एखाद्या गरजूला वेगळ्याप्रकारे उपयोग होऊ शकतो. 

आपल्याला हवे ते शिक्षण घेण्यात किंवा सज्ञान करण्यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे. आपल्याला शहाणे करणार्‍या अशा पुस्तकांना रद्दीमध्ये टाकणे, योग्य नाही. निकाल लागल्यानंतर सुट्ट्यांमध्ये प्रत्येक घरातील पाच ते दहा किलो पुस्तकांची रद्दी  विक्रेत्यांकडे कवडीमोलाने विकली जाते. अशाप्रकारे लाखो विद्यार्थी आज शालेय शिक्षण घेत आहेत. दरवर्षी कितीतरी टन रद्दी अशीच निरुपयोगी पद्धतीने विकली जाते. जुन्या आणि वापरलेल्या पुस्तकांचा आपल्यापुरता वापर संपला तरी त्यांचा अन्य कुणाला तरी आणि वेगळ्याप्रकारे उपयोग होऊ शकतो. मात्र, त्यासाठी विशाल दृष्टिकोन आणि उदात्त विचार करायला हवा.

पूर्वी जुनी आणि वापरलेली पुस्तके वापरली जायची. शक्यतो आपला छोटा भाऊ किंवा बहीण तसेच घरातील किंवा शेजारच्या मुलांना दिली जात होती. अनेक वषार्ंपासूनची ही पुस्तक वापरण्याची पद्धत आहे. मात्र, शहरांमध्ये तसे होत नाही. शासनाकडूनही महापालिका आणि खासगी शाळांना मोफत शालेय पुस्तके मिळत असल्यामुळे त्यांनाही या पुस्तकांचा उपयोग होत नाही. शेवटी ही पुस्तके घरात ठेवून काय करायचे असा विचार करुन त्यांना रद्दी विकले जाते.  

यासाठी पुस्तके रद्दी देण्यापूर्वी चांगल्या पुस्तकांना कव्हर घालून जवळचे वाचनालय, शाळा किंवा शालेय उपक्रम राबवणार्‍या एखाद्या संस्थेला भेट दिली तर पुस्तके नाहीत म्हणून शाळेत न जाणार्‍या एखाद्या मुलांच्या शिक्षणाची सोय होईल. तुमच्याकडील कोर्‍या वह्यासुद्धा अशा मुलांना उपयोगी पडतील. मोठमोठ्या सोसायट्या, कॉलनीमध्ये रद्दी दानाचा उपक्रम राबविल्यास त्यातून जो निधी जमा होईल त्यातून एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागू शकतो. पुस्तके किंवा कुठलीही जुनी वस्तू कधीच कालबाह्य होत नाही. प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग होतो. फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.