Sun, Jul 21, 2019 08:30होमपेज › Pune › कोयत्याचा वापर दहशतीसाठी!

कोयत्याचा वापर दहशतीसाठी!

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:20AMपुणे : पुष्कराज दांडेकर 

किरकोळ भांडण होते.... भांडणाचा बदला तर घ्यायचाय. मग काय खुन्नस काढण्यासाठी आणि समोरच्याचा काटा काढायचाय तर मग चाकू, पिस्तूल कशाला लागते. तीन-चारशे रुपयांना मिळणारा कष्टकर्‍यांचा कोयता घेऊन तो थेट त्याच्यावर हल्ला चढवतो अन् सुरू होते दाक्षिणात्य चित्रपटात दाखविल्याप्रमाणे थरारनाट्य. एवढेच काय तर तो महाविद्यालयात जातानाही बॅगेत कोयता घेऊन जातो. हे चित्र सध्या शांत अन् सुसंस्कृत म्हणवल्या जाणार्‍या शहरातील गल्लीबोळात पाहायाला मिळत आहे. त्यामुळे शहराच्या सामाजिक स्वास्थ्याला गालबोट लागत आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटात थ्रील निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेऊन गुंडाचा रक्तपात करणारा नायक पाहिला की अंगावर काटा उभा राहतो. मात्र, हे थ्रील आता शहरातही कधी कधी दिसू लागले आहे; या प्रकारात अनेकांना जीव गमावावा लागला आहे. किरकोळ भांडण झाले, लूटमार करायचीय, दरोडा टाकायचाय, वाहनांची तोडफोड करायचीय, परिसरात दहशत निर्माण करायची, मग पिस्तूल, तलवार या खर्चिक आणि धोक्यात आणणार्‍या हत्यारापेक्षा बाजारात तीनशे ते चारशे रुपयांना मिळणारा कोयता सहज उपलब्ध होतो. त्यामुळे या कोयत्याची ‘किंमत छोटी दहशत मात्र मोठी’ झाली आहे. 

दहशत पसरविण्यासाठी कोयता 

शहरात मागील वर्षी खुनाचे 110, खुनाचा प्रयत्न केल्याचे 163, दंगा केल्याचे 272, तर दुखापतीचे 1222 गुन्हे दाखल आहेत. या वर्षी मागील पाच महिन्यात खुनाच्या प्रयत्न केल्याचे 88, तर तोडफोड केल्याचे 23 गुन्हे दाखल आहेत. परिसरात दहशत पसरविण्यासाठी कोयत्याचा सर्रासपणे वापर केला जातो. तरुण, सराईत गुन्हेगार फिल्मी स्टाईलने हातात कोयता घेऊन हवेत फिरवत असतात. त्यामुळे गंभीर गुन्ह्यांमध्ये, तसेच एकमेकांना खुन्नस देण्यासाठी, अशी टोळकी हातात कोयते घेऊन वाहनांवर येऊन परिसरातील वाहनांची तोडफोड करत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
बहुतेक गुन्ह्यांमध्ये सर्रासपणे कोयता वापरला गेला असल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे. मागील वर्षी अकरावीत शिकणार्‍या बेशिस्त विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी शिक्षकांनी केस कापण्यास आणि नीट राहण्यास सांगितले. या कारणावरून त्याने बॅगेतून चक्क कोयता आणला आणि शिक्षकाचाच काटा काढण्यासाठी त्यांच्यावर वार केले. किरकोळ वादातून हडपसर येथे एका तरुणाने आपल्याच मित्रावर महाविद्यालयाच्या गेटवरच कोयत्याने हल्ला चढविला; ही उदाहरणे ताजीच आहेत. पोलिसांकडून गुन्हा घडल्यानंतर पोलिस ठाणेस्तरावर कोयते जप्त केले जातात; मात्र याची नोंद आयुक्तालय स्तरावर केली जात नाही. त्यामुळे कष्टकर्‍यांचा कोयता हा सामान्यांच्या जीवावर उठतो आहे. या बाबी गांभीर्याने न घेतल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.

100 ते 400 रुपयांत उपलब्ध 

कोयता हा ऊस तोडणी, झाडांची छाटणी, नारळ कापण्यासाठी आणि मांस, मासे कापण्यासाठी वापरला जातो. कष्टकर्‍यांसाठी हा कोयता सहजपणे तयार करून विकला जातो. मंगळवार पेठेतील जुना बाजार किंवा इतर ठिकाणी लोखंडी कोयता, स्टीलचा कोयता सहजपणे 300 ते 400 रुपयांना मिळतो. त्यामुळे गुन्हेगारी कृत्ये करणार्‍या तरुणांना कोयता सहजपणे उपलब्ध होतो. कष्टकर्‍यांसाठी लागणारे हत्यार असल्याने त्यावर कोणतेही नियंत्रण नाही. विक्रेतेही कशासाठी कोयता हवा आहे, याची चौकशी करत नाहीत. त्यामुळे कोयत्याच्या उपलब्धतेवर नियंत्रण आले नाही, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.