Thu, Apr 25, 2019 08:03होमपेज › Pune › कर्जमाफीच्या याद्यांसाठी नव्या सॉफ्टवेअरचा उपयोग

कर्जमाफीच्या याद्यांसाठी नव्या सॉफ्टवेअरचा उपयोग

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये सहकार विभागातील अधिकारी, कर्मचारी व्यस्त असल्यामुळे सहकार विभागातील निवडणुकांसह अन्य कामे थंडावल्याचे चित्र  आहे. माहिती तंत्रज्ञान विभाग आणि बँकांनी सादर केलेल्या ऑनलाईन अर्जांतील आकडेवारींसह नावे, आधार क्रमांक आदींचा ताळमेळ लागत नसल्याने या माहितीची जुळवाजुळव करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. त्यासाठी नव्या सॉफ्टवेअरमध्ये माहिती भरण्याचे काम सुरू असल्याचे सहकार आयुक्तालयातून सांगण्यात आले. 

कर्जमाफीच्या योजनेनुसार राज्यातील शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे काम करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील थकीत कर्जदारांची माहिती संकलनाचे काम तत्पुर्वी पूर्ण करण्यात आले होते. त्यामध्ये शेतकर्‍यांची माहिती 1 ते 66 तक्त्यात भरण्यात आली. शेतकर्‍यांनी ऑनलाइन अर्जातील माहिती आणि बँकांची ऑनलाइन माहितीची छाननी सुरु असता विविध अडचणी समोर आल्या. प्रातिनिधिक स्वरूपात काही शेतकर्‍यांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्राच्या वितरणाचे कामही जिल्हास्तरावर राबविण्यात आले. या बाबत सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे म्हणाले की, राज्यसरकारकडून प्राधान्याने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची कामे करण्यासाठी सूचना असून त्यामुळे या कामात अधिकारी, कर्मचार्‍यांनी अधिक लक्ष दिले आहे.