Sun, Aug 25, 2019 19:51होमपेज › Pune › स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिका मालमत्तेचा वापर

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिका मालमत्तेचा वापर

Published On: Aug 11 2018 1:21AM | Last Updated: Aug 11 2018 12:03AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारती, जागा, शाळा, पथदिवे, चौक, उद्यान आदी मालमत्तांचा वापर केला जाणार आहे. या वापरास परवानगी देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

ही सभा 20 ऑगस्टला आहे. नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच सभा ठरणार आहे. सभेपुढे स्मार्ट सिटीसंदर्भातील विषय आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने ‘एरिया डेव्हल्पमेंट’ (एबीडी) आणि ‘पॅन सिटी’ असे दोन प्रकारे विभागणी करून विकास केला जाणार आहे. त्यामध्ये एकूण 1 हजार 149 कोटी 20 लाख खर्चाचे प्रकल्प व योजनांचा समावेश आहे. ‘एबीडी’साठी 593 कोटी 67 लाख आणि पॅन सिटीसाठी 555 कोटी 53 लाख रकमेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी अभियानात तिसर्‍या टप्प्यात निवड झाली आहे. त्यासाठी एसपीव्ही (विशेष उद्देश वहन) कंपनीची स्थापना 13 जुलैला करण्यात आली. या अभियानासाठी 5 वर्षांसाठी केंद्राकडून 500 कोटी व राज्य शासनाकडून 250 कोटी अनुदान मिळणार आहे. तर, पालिकेचा स्वहिस्सा 250 कोटी आहे. येत्या 5 वर्षांत स्मार्ट सिटीतील प्रकल्प पूर्ण करण्याची उद्दिष्टे आहेत. 

यामध्ये पुरेसा पाणीपुरवठा, खात्रीशीर वीजपुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम इंटरनेट सुविधा, शहरी आरोग्य व शिक्षण सुविधा, ई-गर्व्हनन्स, नागरिकांचा सहभाग, शाश्‍वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा व संरक्षण आदी घटकांचा समावेश असलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे गेल्या वर्षी 31 मार्चला पाठविला आहे. हे स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना पालिकेच्या मालकीच्या जागा, रस्ते, उद्याने, पथदिवे, चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्तांचा वापर करण्यात येणार आहे. त्यास परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव 20 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.