होमपेज › Pune › अद्ययावत तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट सिटी’साठी वापर

अद्ययावत तंत्रज्ञानाचा ‘स्मार्ट सिटी’साठी वापर

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 25 2017 12:10AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’साठी अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहेत. जागतिक बाजारपेठेत येणार्‍या नवनव्या तंत्रज्ञानाची तुलना करून ते शहराच्या विकासासाठी वापरले जाणार आहे. त्यासाठी देशी व परदेशी कंपन्यांशी चर्चा केली जात आहे, असे महापालिकेचे आयुक्त व ‘स्मार्ट सिटी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

‘स्मार्ट सिटी’ विषयावर ते पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त हर्डीकर म्हणाले की, ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पिंपरी-चिंचवड दोन वर्षे मागे आहे. शहराचा तिसर्‍या टप्प्यात समावेश झाला आहे. पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात समाविष्ट झालेल्या शहरांनी केलेल्या विकास प्रकल्पांची महापालिका माहिती घेत आहे. गेल्या आठवड्यात 3 दिवसांची कार्यशाळा घेऊन ‘तांत्रिक’ विषयावर सविस्तर चर्चा केली गेली. एका तंत्रज्ञान कंपनीसोबत बुधवारी (दि.20) चर्चा झाली.  

शहरात तीन टप्प्यांत तांत्रिक विस्तार केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात बेसिक नेटवर्क सक्षमतेसाठी फायबर केबल जाळे शहरभर पसरविले जाईल. दुसर्‍या टप्प्यात सदर सेवेत माहिती साठा, नियंत्रण, सर्वेक्षण, संदेशयंत्रणा सेवा अधिक प्रबळ केली जाईल. तिसर्‍या अखेरच्या टप्प्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाच्या साह्याने सार्वजनिक वाहतूूक जोडून ती अधिक वेगवान केली जाईल. 

या आयटी तंत्रज्ञानासाठी गुगल, फेसबुक, मायक्रोेसॉफ्ट आदींसह विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. इंटरनेटसह, मोबाईल अ‍ॅप सर्व्हिस, नेटवर्किंग आदींबाबतची पडताळणी केली जात आहे. ‘स्मार्ट सिटी’तील या तंत्रज्ञानासाठी विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे. जगातील बाजारपेठ अद्ययावत असलेल्या तंत्रज्ञान सेवेचा लाभ घेऊन शहरातील नागरिकांना तो दिला जाईल. त्यामुळे शहर तिसर्‍या टप्प्यातही सध्याच्या तंत्रज्ञानानुसार विकसित होईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.