होमपेज › Pune › हिंजवडीतील राजकारणात ‘भाईगिरी’चा वापर

हिंजवडीतील राजकारणात ‘भाईगिरी’चा वापर

Published On: Mar 03 2018 1:46AM | Last Updated: Mar 03 2018 12:30AMवाकड : वार्ताहर 

आयटी हब म्हणून जगभर प्रसिद्ध असलेल्या हिंजवडीच्या सत्तेची चावी खिशात ठेवण्यासाठी साम दाम दंडाचा वापर केला जाऊ लागला आहे. गटातटाचे राजकारण चांगलेच तापू लागले असून, सरपंच- उपसरपंचांची निवड होईपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांना पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी नुकतीच करण्यात आली आहे.

या मागणीचे पत्र नुकतेच हिंजवडीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे. त्यावर हिंजवडीच्या नऊ सदस्यांसह गावातील काही ग्रामस्थांच्या सह्या आहेत. शासकीय गायरानात अतिक्रमण केल्याप्रकरणी हिंजवडीतील सरपंच-उपसरपंचांसह एकूण 8 जणांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल दोन वर्षे हिंजवडीचा कारभार प्रशासकाकडून सुरू होता. अपात्र सदस्यांनी न्यायालयीन लढा सुरू ठेवला; परंतु उच्च न्यायालयाने देखील त्यांना अपात्र ठरवल्याने रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लावण्यात आली होती.  सुरुवातीला जिल्हाधिकारी नंतर विभागीय आयुक्त व त्यानंतर उच्च न्यायालयाकडून अपात्र ठरलेल्या काही सदस्यांनी सर्वोच न्यायालयात धाव घेत त्या निर्णयास स्थगिती मिळवली. तसेच, काही जागांवर बिनविरोध निवडी करण्यात आल्या. त्यामुळे उच्चन्यायालयात न गेलेल्या एकाच जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.

विरोधकांनी गायरानात अतिक्रमण केल्याचा मुद्दा लावून धरत सत्ताधार्‍यांची चांगलीच कोंडी केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती दिल्याने अपात्र सदस्यांनी पुन्हा ‘कम बॅक’ केले आहे. या सर्व नाट्यमय घडामोडीनंतर दोन वर्षांनंतर हिंजवडीत सरपंच, उपसरपंच मिळणार आहेत. आपल्या गटाला तो मान मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  पुरेसे संख्याबळ करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. फोडाफोडीच्या राजकारणात नात्यागोत्यातून मनधरणीसोबत दबाव तंत्रदेखील वापरण्यात येत आहे. त्यामुळे सरपंच, उपसरपंच निवड होईपर्यंत पोलिसांची मदत मिळण्याची मागणी करण्यात आली आहे.