Tue, Jul 16, 2019 21:47होमपेज › Pune › वीज बचतीचा ‘एलईडी फंडा’

वीज बचतीचा ‘एलईडी फंडा’

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 1:00AMपुणे : शिवाजी शिंदे

वीजबचतीसाठी केंद्र सरकारने एलईडी बल्बचा वापर करण्याची साद घातली अन् पुणेकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने, वर्षाला तब्बल 88 मेगावॅट अर्थात 117  कोटी रुपयांची वीजेची बचत झाली आहे. त्याचबरोबर कार्बन उर्त्सजनही कमी झाल्याने, घरगुती वीजबचतीचा हा पर्यावरणपुरक फंडा यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एलईडी बल्ब योजनेला राज्यातचांगलाच प्रतिसाद मिळाला. वर्षभरात राज्यात सुमारे दोन कोटी 17 लाख 74 हजार 506 बल्बची विक्री झाली. या माध्यमातून एका वर्षात 287 दशलक्ष युनिट विजेची बचत झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची 1131 कोटी रुपयांची बचत झाली आहे. 

पूर्वी वीजग्राहक घरगुती वापरासाठी पारंपरिक बल्बचा वापर करीत होते. परिणामी  वीजग्राहकांना सरासरीपेक्षा जास्त वीजबिल येत होते. मात्र, वीजबचतीसाठी 2016 साली केंद्राने ही योजना जाहीर केली. या योजनेचा प्रारंभ महाराष्ट्रात मुंबई येथून करण्यात आला. ती देशभर राबविण्यात आली.घरगुती आणि सोसायट्यांमधील पाकिर्र्ंगमध्ये  सात आणि नऊ वॅटचे बल्ब वापरण्यास प्रोत्साहन देण्यात आले. ही योजना केंद्र शासनाची असली तरी वीजग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी ‘डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम’अंतर्गत ‘एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून  सुरू करण्यात आले. 

या कंपनीला राज्यात 3 कोटी 87 लाख एलईडी बल्ब बसविण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने दिले आहे. त्यापैकी आतापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त बल्ब बसविण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक एलईडी बल्ब पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात बसविण्यात आले असून, ही संख्या 34 लाख 43 हजारांच्या पुढे आहे. शहर आणि जिल्ह्यात पुढील काळात किमान पन्नास लाख एलईडी बल्ब बसविण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती एनर्जी एफिशियन्सी  सर्व्हिसेस लिमिटेडचे राज्याचे व्यवस्थापक दीपक कोकाटे यांनी दिली.

बापरे 1 मेगा वॅट निर्मितीसाठी लागतात तब्बल 5 कोटी!

एक मेगा वॅट वीजनिर्मिती करण्यासाठी करावा लागणार्‍या प्रकल्पाचा अंदाज घेता सुमारे 5 कोटींचा खर्च येतो तसेच प्रकल्प सुरु झाल्यावर तेवढ्यात प्रमाणात कोळसाही जाळावा लागतो. त्यामुळे एलईडी बल्ब वापरातून होणार्‍या बचतीचा फायदा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे खूप मोठा असल्याचे दीपक कोकाटे यांनी सांगितले.