Mon, Jun 17, 2019 02:56होमपेज › Pune › भव्य नाट्यगृहांची उभारणी कशासाठी?

भव्य नाट्यगृहांची उभारणी कशासाठी?

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 21 2018 11:36PMपिंपरी : पूनम पाटील

शहरवासीयांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी शहरात आजवर अद्ययावत नाट्यगृहांची उभारणी करण्यात आली; मात्र ज्या कारणांसाठी नाट्यगृहे अभारण्यात आली आहेत त्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. दिवसेंदिवस नाट्यगृहांत इतर कार्यक्रमांची संख्या वाढत असून, नाटकांची संख्या घटत आहे; तसेच नाटकांना प्रेक्षकच नसल्याने भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाकडे नाट्यसंस्थांनी पाठ फिरवली आहे. पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरात गेल्या चार महिन्यांत केवळ एक नाट्यप्रयोग झाला आहे. त्यामुळे नाटकेच होत नसतील, तर भव्य नाट्यगृहांची उभारणी कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिर सध्या नुतनीकरणामुळे जूनपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. निगडी प्राधिकरणातील ग.दि.माडगूळकर नाट्यगृहाच्या उभारणीचे काम सुरू आहे. नाटकांपुरता विचार केल्यास चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाला सर्वाधिक पसंती आहे.  विविध संस्था, संघटना, राजकीय पक्ष व महापालिका यांच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त  उरलेल्या तारखा नाटकांसाठी दिल्या जातात. त्यामुळे नाट्यसंस्थांच्या पदरी निराशा पडते. चांगल्या नाटकांनाही तारखाच मिळत नाहीत, अशी तक्रार नाट्यसंस्थांनी केली आहे; मात्र नाट्यगृह व्यवस्थापनाकडून या तक्रारी फेटाळण्यात आल्या असून, प्रेक्षक उदासीन असल्याने नाटक कमी होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे. 

मोफत कार्यक्रमांनाच प्रेक्षकांची गर्दी 

चिंचवडला नाटकांना तारखा मिळत नाहीत, तर याउलट भोसरी नाट्यगृहात नाटके होत नाहीत, अशी स्थिती आहे. या नाट्यगृहाच्या उभारणीपासूनच या नाट्यगृहाला नाटकांचे व प्रेक्षकांचे वावडेच असल्याची वस्तुस्थिती आहे. नाटकांना प्रेक्षकांचे पाठबळच नसल्याने खर्च जास्त व उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. येथे प्रेक्षक फक्त विनामूल्य प्रयोगांनाच गर्दी करतात. येथे आवश्यक सोयी-सुविधांची वानवा असल्याचे कलाकारांचे म्हणणे आहे. भाड्याव्यतिरिक्त नाट्यगृहातील कर्मचार्‍यांना वरकमाईची अपेक्षा असते. दिलेल्या भाड्यामध्ये नाटक कंपन्यांना मदत करण्यास ते तयार नसतात; तसेच कुणी सेलिब्रेटी येणार असेल, तर त्यावेळी हेच कर्मचारी उत्साहाने काम करतात. नाट्यगृहाच्या भाड्याव्यतिरिक्त फलक लावण्याचे अलग चार्जेस आकारण्यात येतात. एकीकडे आकारलेल्या भाड्यात सर्वच चार्जेस असल्याचे नाट्यगृहांचे म्हणणे आहे, तर याउलट भाड्याव्यतिरिक्त जादा दर आकारण्यात आल्याची ओरड नाट्यसंस्था करत आहेत. 

फुले रंगमंदिरात आजवर केवळ एकच नाटक

मागील वर्षी 13 ऑक्टोबरला निळू फुले नाट्यगृह सुरू झाले. येथेही म्हणावा तसा नाटकांना प्रतिसाद नाही. नाटकासाठी पाच हजार रुपये अनामत रक्कम द्यावी लागते. भाडे 5487 रुपये, यात सर्व फलक बोर्ड ‘जीसटी’यासह सर्व चार्जेस आकारले जातात, अशी माहिती नाट्यगृहाच्या वतीने देण्यात आली.