Sun, Aug 25, 2019 08:59होमपेज › Pune › माता रमार्ईंचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती

माता रमार्ईंचे जीवन महिलांसाठी प्रेरणादायी : राष्ट्रपती

Published On: May 31 2018 1:44AM | Last Updated: May 31 2018 1:44AMपुणे : प्रतिनिधी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यांच्या पत्नी, माता रमाईचे खूप मोठे योगदान आहे. बाबासाहेबांच्या कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा होऊ नये, यासाठी रमाईंनी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. बाबासाहेब नावाच्या इमारतीचा पाया रमाई होत्या, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खर्‍या अर्थाने रमाईंचे जीवन प्रत्येक भारतीय महिलेसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

पुणे स्टेशनजवळील महामाता रमामाई आंबेडकर उद्यानात उभारण्यात आलेल्या माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवारी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री जलसंपदा व जलसंधारण विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, बाबासाहेबांच्या महान व्यक्तिमत्त्वाचा आदर संपूर्ण जगात केला जातो. त्यांना विश्वविख्यात करण्यात रमाईंचे मोठे योगदान आहे. डॉ. बाबासाहेबांच्या असाधारण जीवनयात्रेत अर्धांगिनीच्या रूपात, प्रत्येक पावलावर रमाईंनी त्यांना ताकद दिली आहे. बाबासाहेबांना एक साधारण भीमा नामक व्यक्तीपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामक महान व्यक्ती बनण्याच्या प्रवासात रमाईंचे मोठे योगदान आहे. ‘डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाची तुलना एका विशाल इमारतीशी करता येऊ शकते आणि त्या इमारतीची आधारशिला या रमाई आहेत, अशा शब्दांत राष्ट्रपती कोविंद यांनी रमाईंचा गौरव केला. कठीण काळात ज्यावेळी बाबासाहेबांना कोणीही साथ देत नव्हते, त्या काळात रमाई यांनी बाबासाहेबांना साथ दिली. त्यांना केवळ 37 वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या महान जीवनयात्रेसाठी पूर्णपणे तयार केल्यानंतरच शेवटचा श्वास घेतला, असेही राष्ट्रपती या वेळी म्हणाले.

या वेळी बोलताना केंद्रीय मंत्री जावडेकर म्हणाले, माता रमाईंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्याच हस्ते करण्याचा मनोदय ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य आणि महामाता रमाई आंबेडकर स्मारक समितीचा होता, त्याला आज यश मिळाले आहे. राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले, माता रमाईंच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते झाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापौर मुक्ता टिळक यांनी केले, तर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी आभार मानले.

हिंदू कोड बिलासाठी बाबासाहेबांनी दिली कुर्बानी

डॉ. बाबासाहेबांच्या आरंभी काळात माता रमाईंचा प्रभाव होता आणि त्याच कारणामुळे महिलांना समानाधिकार देण्यासाठी ते सदैव सक्रिय होते. ‘हिंदू कोड बिल’ त्यांनी सादर करून त्यासाठी बाबासाहेबांनी मोठी कुर्बानी दिली आहे. जगातील अनेक देशांच्या घटनेमध्ये महिलांना समानाधिकार देण्यास वेळ लागला. मात्र, भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्यापासून महिलांना मताधिकार आणि समान अधिकार देण्याचे काम बाबासाहेबांनी केले. देश घडवणार्‍या महापुरुषांमध्ये बाबासाहेबांचा समावेश आहे, असे गौरवोद‍्गारही राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले.