Wed, Apr 24, 2019 21:40होमपेज › Pune › पुण्याचे काम संपेपर्यंत निगडीपर्यंत मेट्रो होईल

पुण्याचे काम संपेपर्यंत निगडीपर्यंत मेट्रो होईल

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:22AMपिंपरी : प्रतिनिधी 

पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवड शहरात वेगात सुरू आहे. शहरातील प्रशस्त रस्ता आणि पुण्यातील कामाचा वेग लक्षात घेता तेथील काम पूर्ण होऊन संपेपर्यंत निगडीपर्यंत मेट्रोचे काम होईल, असा विश्‍वास महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केला. 

पहिल्या टप्प्यात पिंपरी ते निगडी मेट्रोचे काम होऊ शकत नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापाठोपाठ महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी असे स्पष्ट केले. त्यामुळे पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, असा दावा करणारे स्थानिक पदाधिकारी व नेतेमंडळी उघडे पडले आहेत. या संदर्भात पवार यांना विचारले असता, ते बोलत होते. 

एकनाथ पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पुणे-मुंबई जुन्या महामार्गाच्या ‘एक्स्प्रेस वे’वर मेट्रोच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. शहरात प्रशस्त रस्ते असल्याने काम वेगात सुरू आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी मेट्रोचे काम पूर्ण होईल. उलट, पुण्यात विविध कारणांमुळे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवडच्या तुलनेत काहीसे संथ आहे. पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो कामाचे डीपीआर बनविण्याचे काम सुरू झाले आहे. 

ते म्हणाले की, पिंपरी ते निगडीचा डीपीआर तयार होऊन त्यावर राज्य व केंद्राची मंजुरी मिळेल. त्यांच्याकडून निधीचा हिस्सा निश्‍चित होऊन, काम सुरू होईल. पुण्याच्या बरोबरीने पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोचे काम होईल आणि पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो धावेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.