Mon, Apr 22, 2019 01:43होमपेज › Pune › निर्माणाधीन पुलाखाली सुरक्षेचे तीनतेरा  

निर्माणाधीन पुलाखाली सुरक्षेचे तीनतेरा  

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 15 2018 11:18PMदेहूरोड : उमेश ओव्हाळ

वाराणसी कॅन्टोन्मेंट हद्दीत महामार्गावर निर्माणाधीन उड्डाणपुलाचा स्पॅन कोसळून दुर्घटना घडली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत उभारण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ठेकेदाराच्या कर्मचार्‍यांकडून वारंवार सूचना देऊनही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. 

देहूरोड येथे पुणे-मुंबई महामार्गावर सुमारे पाऊण किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्ण्याचे काम सुरू आहे. कमालीची वर्दळ असलेल्या या पट्ट्यात पूलाच्या उभारणीचे काम करताना कर्मचार्‍यांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. सद्यस्थितीत पुलाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून पूलावर स्पॅन टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना संबंधित यंत्रणेकडून सुरक्षेसाठी नागरिकांना वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नागरिकांकडून त्याचे उल्लंघन करून धोकादायकरित्या पूलाखालीच वाहने पार्किंग केली जात आहेत. या ठिकाणी पार्कींग होणार्‍या वाहनांची संख्या पाहता आजवर ही वाहने कुठे लावली जात होती, असा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.

विशेष म्हणजे पूलावर ज्या भागात दोन खांबांमध्ये सर्वाधिक सुमारे चाळीस मीटर लांबीचे अंतर आहे, त्याच ठिकाणी काही दिवसांपासून रिक्षातळ सुरू झाला आहे. तर याच ठिकाणी दुसर्‍या बाजुला तीन चाकी टेंपोचा तळ सुरू झाला आहे. त्यामुळे या भागात दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. त्यात डॉ. आंबेडकर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रचंड ताण याच भागात दिसून येतो. सतत कोंडी निर्माण होणार्‍या या भागात एकमेकांच्या पुढे जाण्याच्या स्पर्धेतून मोठी व उंच वाहने पूलाच्या खांबाला धडकण्याचे प्रकार वरचेवर घडत आहेत. 

एकंदरीतच या निंर्माणाधिन पूलाच्या सुरक्षेकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांची भावना आहे. या पूलाचे काम सुरू झाल्यापासून चौकांतील वाहतूक पोलीस गायब झाले आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डाने काही महिने प्रमुख चौकात ट्रॅफिक वॉर्डन नेमले होते. पण त्यांनाही हटविण्यात आले आहे. पूलाचे काम करणार्‍या ठेकेदाराकडून सुरक्षेसाठी लावण्यात येणारे अडथळे (बॅरिकेडस्)काढून टाकण्यात आले आहेत. त्यामुळे पुलाखाली धोकादायक पार्कींगचे प्रमाण वाढले आहे. 

विशेष म्हणजे काही ठिकाणी तर व्यवसाय थाटण्यात आले आहेत. बंसल हॉस्पिटल आणि सरकार प्रॉपर्टी या दुकानासमोर पूलाखाली गॅरेज थाटण्यात आली आहेत. ठाणे जनता बँक, आधार हॉस्पिटल, पुणे जिल्हा सहकारी बँक या परिसरात पूलाखाली मोठ्य प्रमाणात चारचाकी वाहने पार्कींग केली जातात. एकंदरीतच पूलाच्या धोक्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. भविष्यात वाराणसी प्रमाणे एखादी घटना घडल्यास दोष कुणाला द्यायचा हा खरा प्रश्‍न आहे.