Sun, May 26, 2019 11:24होमपेज › Pune › पुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा

पुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा

Published On: Apr 25 2018 2:00AM | Last Updated: Apr 25 2018 1:45AMपुणे : निमिष गोखले 

पुणे स्टेशनवर सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली  नाही. स्टेशनच्या पाठीमागील बाजूस (सेकंट एन्ट्री) राजा बहादूर मिल रोड येथून स्कायवॉकने चढताना मेटल डिटेक्टर, लगेज स्कॅनरचा पत्ताच नसून प्रवाशांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे. पुणे स्टेशनवरून दररोज दोनशे रेल्वे ये-जा करतात. त्याचप्रमाणे तब्बल 2 लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असून देखील सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने कोणतीही विशेष सोय केलेली नाही.  

पुणे शहरात अलीकडच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे पुणे अतिरेक्यांचे सॉफ्ट टार्गेट असून कायमच हिट लिस्टवर राहणार आहे, अशी माहिती खुद्द गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. परंतु, रेल्वे प्रशासन, आरपीएफ, जीआरपी यांनी यातून धडा घेतलेला नसून पुणे स्टेशनवर ‘आओ जावो घर तुम्हारा’, अशी स्थिती सध्या दिसत आहे. प्रवाशांचे सामान तपासण्याची कोणतीही यंत्रणा येथे नाही.  पुणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म एकवर शिरताना दोनच मेटल डिटेक्टर आहेत, मात्र ते सुरू नाहीत. शेजारीच लगेज स्कॅनर मशिन असून तेही बंदच असते. 

मशिनच्या शेजारी पोलिस कर्मचारी ठाण मांडून बसलेले आढळतात, मात्र प्रवाशांची कोणतीही तपासणी करण्यात येत नाही.  सरकत्या जिन्याच्या बाजूच्या मुख्य पुलावरही तीच परिस्थिती असून तेथे देखील सुरक्षा यंत्रणा नसल्याचे धक्कादायक चित्र दिसते. वाहन तपासणी करण्याकरिता व्हेइकल स्कॅनर मशिन काही महिन्यांपूर्वी विकत घेण्यात आली. मात्र मुख्य प्रवेशद्वार व सेकंड एन्ट्रीच्या येथे त्याचा वापर होताना दिसत नाही. यामुळे नजीकच्या काळात पुणे स्टेशनवर अनूचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसून रेल्वे प्रशासनाने वेळीच जागे व्हावे, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

Tags : Pune, Unsafe, security, Pune, station