Fri, Apr 19, 2019 12:05होमपेज › Pune › अप्रमाणित गतिरोधक; वाहनचालकांना धोका   

अप्रमाणित गतिरोधक; वाहनचालकांना धोका   

Published On: May 15 2018 1:32AM | Last Updated: May 14 2018 11:43PMइंदोरी : वार्ताहर 

तळेगाव-चाकण मार्गावरील इंद्रायणी महाविद्यालयासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक उभारले आहेत; मात्र गतिरोधक नियमबाह्य पद्धतीने उभारल्याने या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या चालक आणि दुचाकींचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. गतिरोधकाची लांबी नियमापेक्षा जास्त आहे तर उंची कमी आहे.  गतिरोधकावर पांढरे परावर्तक पट्टे मारण्यात आलेले नाहीत.  त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधकांचा अंदाज येत नाही. प्रसंगी वाहनांचा वेग कमी होत नाही किंवा वाहनचालकांना वाहनांचा गतिरोधक दिसल्यानंतर वेग कमी करण्यास संधी मिळत नाही. वाहने वेगात असल्याने गतिरोधकावर वाहने उंच उडतात. वाहने उंच उडाल्याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून अपघात घडतात.

या ठिकाणी एकूण 4 गतिरोधक आहेत त्यांची उंची गरजेपेक्षा कमी आहे; या ठिकाणी गतिरोधक महत्वाचे देखील आहेत. या ठिकाणी रामभाऊ परुळेकर शाळा तसेच इंद्रायणी महाविद्यालय आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची सतत वर्दळ असते सध्या शाळा, कॉलेजला सुट्टी असली तरी देखील हा परिसर लोकवस्तीचा आहे. तसेच तळेगाव-चाकण मार्गावर  मोठ्या वाहनांची सतत वर्दळ असते. अपघात टाळण्यासाठी टाकण्यात आलेले गतिरोधक हेच अपघातास कारणीभूत होऊ शकतात. अशा गतिरोधकांवर तातडीने परावर्तक बसवावेत, अथवा पांढरे पट्टे मारण्यात यावेत, त्याची योग्य जाडी-उंची मोजमाप करून गतिरोधक तयार करावेत, अशी मागणी दुचाकी-चारचाकी चालकांनी  तसेच परिसरातील नागरिकांनी केली आहे.