Mon, Apr 22, 2019 11:44होमपेज › Pune › अनैसर्गिक कृत्य; दहा वर्षे सक्तमजुरी

अनैसर्गिक कृत्य; दहा वर्षे सक्तमजुरी

Published On: Dec 07 2017 1:24AM | Last Updated: Dec 07 2017 12:05AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी 

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकास 10 वर्षेे सक्तमजुरी आणि 15 हजार रुपये दंडाची शिक्षा  विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोणे यांनी सुनावली आहे. सैपन लालसंगी (रा. जुन्या शिर्के बिल्डिंग, ओटास्किम, निगडी) असे शिक्षा देण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सात वर्षीय पीडित मुलाच्या वडिलांनी निगडी पोलिसांत फिर्याद दिली होती. 

पीडित मुलाचे वडील हे मजुरीचे काम करतात. 15 फेबु्रवारी 2015 रोजी मुलगा खेळत असताना आरोपी लालसंगी याने चॉकलेटसाठी पैसे देतो, असे सांगून पीडित मुलाला निगडी येथील एका निर्जन ठिकाणी नेले. तेथे त्याने त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले. हा सर्व प्रकार पीडित मुलाने वडिलांना सांगितल्यानंतर लालसंगी याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानंतर त्याला याप्रकरणी अटक होऊन आरोपपत्र दाखल झाले.  

ही घटना घडली तेव्हा संबंधित मुलगा केवळ सात वर्षांचा होता. त्याच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.  अशा प्रकारचा गुन्हा हा केवळ संबंधित पीडित मुलाविरुद्ध नाही, तर समाजाविरुद्ध आहे. लैंगिक अत्याचारामुळे पीडित मुलांना मानसिक धक्का बसतो. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. अशा प्रकारच्या घटनांचे ओरखडे त्यांच्या मनावर आयुष्यभर कायम राहतात.

त्यामुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांकडे गांभीर्य पाहण्याची गरज आहे. या सर्व बाबींचा विचार करता पीडित मुलाला नुकसानभरपाई योजनेअंतर्गत मिळणे गरजेचे आहे. आरोपीला सुनावण्यात आलेल्या दंडाच्या रकमेतील दहा हजार रुपये पीडित मुलाला देण्यात आले नाही. तर विधी सेवा प्राधिकरणातर्फे ही रक्कम नुकसानभरपाई योजनेअंतर्गत देण्यात यावी, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.

सरकारी वकील लीना पाठक यांनी नुकसानभरपाईसंदर्भातचा मुद्दा न्यायालसमोर युक्तिवादादरम्यान मांडला. अ‍ॅड. पाठक यांनी 8 साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय पुरावे, मुलाची साक्ष आणि वैद्यकीय अहवाल महत्त्वाचा ठरला. गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरीक्षक मदन कांबळे यांनी केला. न्यायालयीन कामकाजात पोलिस सचिन ढवळे यांनी त्यांना मदत केली.