Fri, May 24, 2019 06:44होमपेज › Pune › बेवारस वाहने ताब्यात घेणार

बेवारस वाहने ताब्यात घेणार

Published On: Jan 19 2018 1:55AM | Last Updated: Jan 18 2018 11:48PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील बेवारस वाहने आता ताब्यात घेण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यांवर बेशिस्तीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करावी. शहरातील सर्व वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल्स) ‘लेफ्ट फ्री’ करण्यात यावेत. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, आदी निर्णय महापालिका अधिकारी-पदाधिकारी व वाहतूक पोलिस आधिकार्‍यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आले. यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांना 30 जॅमर वाहन व 30 वॉकी-टॉकी देणार आहे. 

पिंपरी-चिंचवड मध्ये वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे शहराच्या तुलनेत प्रशस्त असलेले रस्तेही अपुरे पडत आहेत. त्यातच शहरात ‘पार्किंग झोन’ धोरणच अस्तित्वात नसल्याने वाहन कोठेही पार्क करण्याचा बेशिस्तपणा वाढीस लागला आहे. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडीसंदर्भातील वृत्त ‘पुढारी’ने पार्किंग झोन धोरणाविनाच स्मार्ट सिटीची धाव; महापालिकेस 35 वर्षे उलटूनही प्रशासन सुस्तच’ या शीर्षकाखाली छायाचित्रासह ठळकपणे वृत्त सोमवारी (दि.15) प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत महापालिकेने तातडीने ही बैठक घेतली. 

या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे, नगरसेवक नामदेव ढाके, शीतल शिंदे;  तसेच विभागाचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. 

शहरातील सर्व सिग्नल्स ‘लेफ्ट फ्री’ करणे. झाडे, फ्लेक्स व बोर्ड अथवा इतर कारणाने झाकले गेलेले सिग्नल्स खुले करणे. पुणे-मुंबई रस्त्यावरील सर्व सिग्नल्सवर बेशिस्तपणे व जादा आसन क्षमतेसह थांबणार्‍या रिक्षांवर नियंत्रण ठेवणे. शहरामध्ये सर्व ठिकाणी पडून असलेली बेवारस वाहने ताब्यात घेणे. बेकायदेशीररीत्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करणे.

पिंपरी कॅम्प, भोसरी-आळंदी रस्ता, आकुर्डी-निगडी गावठाण रस्ता या ठिकाणी सायंकाळच्या वेळी ‘नो एन्टी’ करणे. सार्वजनिक वाहतुकीचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा यासाठी व्यापक स्वरूपात जनजागृती करणे. ‘बीआरटीएस’ मार्गातून खासगी वाहनांना प्रवेश रोखणे. तीनचाकी रिक्षामध्ये बदल करून व्यवसाय करणार्‍या वाहनांवर कारवाई करणे, आदी मुद्द्यांसंदर्भात बैठकीत निर्णय घेण्यात आले.या संदर्भात पदाधिकार्‍यांनी शहरातील वाहतूक समस्येबाबत प्रश्‍न उपस्थित केले. वाहतूक पोलिस अधिकार्‍यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.