Thu, Apr 25, 2019 18:43होमपेज › Pune › विद्यापीठाला मिळणार ‘ग्रीन’?ओळख

विद्यापीठाला मिळणार ‘ग्रीन’?ओळख

Published On: Aug 22 2018 1:23AM | Last Updated: Aug 22 2018 12:58AMपुणे : लक्ष्मण खोत 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पुढील 35 वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला असून, विद्यापीठाला ग्रीन विद्यापीठ अशी नवी ओळख या प्लॅननुसार मिळणार आहे. विद्यापीठ पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने विद्यापीठात सायकल, पादचारी मार्ग आणि इलेक्ट्रिक वाहतुकीला म्हणजेच ‘ग्रीन’ ट्रान्सपोर्टला चालना देण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठात शैक्षणिक, प्रशासकीय निवासी सुविधा केंद्र, अशा विभागात झोनिंग करण्यात येणार आहे. 

विद्यापीठ परिसराचा नियोजनबद्ध विकास व्हावा म्हणून विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. भविष्यकाळातील उच्च शिक्षणाचे महत्त्व ओळखून शैक्षणिक सुविधा, स्पोर्ट्स कल्चर, इतर सुविधांचा विचार करून हा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. विद्यापीठात यापुढे करण्यात येणारी विविध कामे या मास्टर प्लॅननुसारच करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव अरविंद शाळिग्राम यांनी दिली. 

विद्यापीठाची शैक्षणिक ओळख टिकवून ठेवत, विद्यापीठातील विविध समस्यांचा अभ्यास करून उपाययोजना करणारा विद्यापीठाचा हा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर यांनी हा प्लॅन तयार केला आहे. एप्रिल महिन्यात नेमण्यात आलेल्या संस्थेद्वारे विद्यापीठाला मास्टर प्लॅन सादर करण्यात आला होता. लेआऊट महानगरपालिकेला सादर करण्यात आला असून, त्याला मंजुरीही मिळाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

स्पोर्ट्स कल्चर वाढविण्यासाठी सुविधा

विद्यापीठात तब्बल 27 एकर परिसरात ‘स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स’ उभारण्यात येणार आहे. ‘अ‍ॅथलेटिक्स ट्रॅक’ तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. इनडोअर स्टेडियम, शूटिंग रेंज आणि जिम्नॅशियमचे कामही प्रगतिपथावर आहे. एकूणच विद्यापीठात स्पोर्ट्सच्या दृष्टीने अनेक कामे सुरू करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना सर्वच खेळांच्या सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यापीठात स्पोर्ट्स कल्चर निर्माण होण्यास मदत होणार आहे.

दुय्यम दर्जाच्या इमारती होणार इतिहासजमा

विद्यापीठातील दुय्यम दर्जाच्या ज्या इमारतींचे आयुष्यमान संपत आले आहे अशा इमारती जमीनदोस्त करून या मास्टर प्लॅननुसार नवीन इमारती बांधण्यात येणार आहेत. विद्यापीठातील सुमारे 58 हजार 90 स्क्वेअर मी. एवढ्या क्षेत्रातील इमारती पाडण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसारख्या वारसा यादीत स्थान असलेल्या चांगल्या ब्रिटिशकालीन इमारतींचे मात्र संवर्धन करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. 

विद्यापीठाचे कोटी गेट होणार मुख्य प्रवेशद्वार 

महापालिकेच्या आणि पीएमआरडीएच्या विकास आराखड्यानुसार विद्यापीठाच्या आताच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर प्रस्तावित असणार्‍या मेट्रो स्टेशनमुळे विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून कोटी गेट हे मुख्य प्रवेशद्वार करण्यात येणार आहे. त्यामुळे आताच्या मुख्य प्रवेशद्वारातून विद्यार्थी व नागरिकांना फक्त चालत जाता-येता येणार आहे. नजीकच्या काळात महापालिका प्रशासनाने सहाय्य केल्यास औंध रोडवर असलेल्या कोटी गेटवरून विद्यापीठात येण्यासाठी अंडरपास आणि बाहेर जाण्यासाठी ओव्हरब्रिज तयार करून, सिग्नलविरहित यंत्रणा उभी करण्यात येणात असून, कोटी गेटला मुख्य प्रवेशद्वार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

15 लाख लिटरचा सांडपाणी  पुनर्प्रक्रिया प्रकल्प

विद्यापीठातील विविध विभाग, शैक्षणिक संकुले, प्रशासकीय इमारती आणि निवासी इमारतींमधून येणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी 15 लाख लिटर क्षमतेचा सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प विद्यापीठात उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून पुनर्प्रक्रिया झालेले पाणी विद्यापीठातील बागांसाठी वापरण्यात येणार आहे. 

विद्यापीठात होणार ‘पार्किंग स्पॉट’

विद्यापीठात ‘ग्रीन’ ट्रान्सपोर्टला चालना देण्यासाठी अनेक ठिकाणी ‘पार्किंग स्पॉट’ तयार करण्यात येणार आहेत. आरोग्याचा विचार करून हा ‘पार्किंग स्पॉट’ तयार करण्यात येणार असून, सुमारे 3 हजार कार पार्क होतील एवढ्या क्षमतेची पार्किंगची सुविधा येथे उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी, कर्मचार्‍याला पार्किंगपासून ज्या ठिकाणी जायचे आहे, त्याठिकाणी पादचारी मार्गाचा वापर करून चालत अथवा सायकलचा वापर करून 200 मी. अंतर जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, संकटसमयी अग्निशमन आणि अ‍ॅम्ब्युलन्स इमारतीपर्यंत जाण्याची सोयही यात करण्यात आली आहे. 

वृक्षराजी जपणार

विद्यापीठातील दाट झाडांमुळे आणि निसर्गसंपदेमुळे असलेले वैभव ठिकवून ठेवण्यासाठी मास्टर प्लॅननुसार विद्यापीठातील एकूण जागेपैकी सुमारे 40 टक्के जागा ‘ग्रीन परिसर’ म्हणून आणि मोकळी जागा म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे या जागांवर कोणतेही नवीन इमारतीचे बांधकाम करता येणार नाही. तसेच मोकळ्या जागांचे आणि गार्डनचे आंतरजाळे निर्माण करण्यात येणार आहे.