Thu, Jun 27, 2019 11:41होमपेज › Pune › विद्यापीठाला मिळाले इंटरनॅशनल बॅलिस्टिक्स सोसायटीचे सदस्यत्व

विद्यापीठाला मिळाले इंटरनॅशनल बॅलिस्टिक्स सोसायटीचे सदस्यत्व

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:25AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक पातळीवरील प्रतिष्ठित अशा इंटरनॅशनल बॅलिस्टिक्स सोसायटीचे सदस्यत्व मिळाले आहे. असा बहुमान मिळालेले देशातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. देशाच्या संरक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संशोधन संस्था असलेली डीआरडीओ ही आयबीएसची अन्य एकमेव भारतीय सभासद संस्था आहे. विद्यापीठाला संस्थेचे सदस्यत्व मिळवून देण्यासाठी विद्यापीठामधील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन या विभागाने या महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

इंटरनॅशनल बॅलिस्टिक्स सोसायटीची स्थापना क्षेपणास्त्र विज्ञानाच्या प्रसारासाठी 1960 मध्ये करण्यात आली होती. क्षेपणास्त्र विज्ञान क्षेत्रामध्ये अनुभव व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. याचबरोबर,या क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी निर्माण करण्यास उत्तेजन देण्याचे उद्दिष्टही ‘आयबीएस’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

‘आयबीएस’च्या या सभासदत्त्वामुळे डीआरडीओ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास संरक्षण क्षेत्रात वेपन सिस्टीम्ससंदर्भात संशोधन करणार्‍या इतर देशातील संस्थांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी मिळणार आहे. तसेच ‘आयबीएस’च्या इतर सभासद देशांमधील संस्था या क्षेत्रातील संशोधन व तंत्रज्ञानाची ओळख करुन घेण्याची संधी डीआरडीओ व विद्यापीठामधील संशोधकांना ‘आयबीएस’च्या या व्यासपीठाच्या माध्यमामधून मिळणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात संशोधन करणार्‍या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संधीचे नवीन दालन उघडे होणाची शक्यता आहे. 

विद्यापीठामध्ये 2003 मध्ये सुरु करण्यात आलेल्या सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन विभागाने 2011 लष्करी अभियांत्रिकी क्षेत्रामधील विविध प्रकल्पांमध्ये लक्षणीय सहभाग घेतला आहे. लष्करी अभियांत्रिकीमधील बॅलिस्टिकस, फ्ल्युईड, स्ट्रक्चरल डायनामिक्स यांसारख्या विशिष्ट अभ्यास शाखा (फिल्ड्स); व मटेरियल्स मॉडेलिंग, सिग्नल प्रोसिसिंग, मेक्ट्रॉॅनिक्स यांसारख्या इतर क्षेत्रांवर विशेषत्त्वे लक्ष केंद्रित करण्यात विद्यापीठ यशस्वी झाले आहे. यासंदर्भातील विविध प्रकल्प विद्यापीठामध्ये यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. 

नेव्हल रिसर्च बोर्ड, आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट बोर्ड, हाय एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी आणि डिफेन्स मेटालर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी यांसारख्या लष्कराच्या विविध संशोधन संस्थांबरोबर विद्यापीठाने यासंदर्भात विविध प्रकल्प केले असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

‘आयबीएस’ची पुढील परिषद हैदराबाद येथे 

सरंक्षण क्षेत्रातील विविध घडामोडींवर चर्चा करण्यासाठी ‘आयबीएस’कडून दर दोन वर्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर एका परिषदेचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षी ही परिषद लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आली होती. पुढील वर्षी होणारी आयबीएसची परिषद ही हैदराबाद येथे होणार असून भारतामधील ही पहिलीच आयबीएस परिषद होणार आहे. या परिषदेस निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. सारस्वत आणि संरक्षण मंत्र्यांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. सतीश रेड्डी उपस्थित राहणार असून आयबीएस सभासद म्हणून विद्यापीठास या परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

 

Tags : pune, pune news, pune university, International Balletics Society,