Thu, Jul 18, 2019 02:39होमपेज › Pune ›

पुणे विद्यापीठ होणार स्मार्ट सोलर विद्यापीठ
 

पुणे विद्यापीठ होणार स्मार्ट सोलर विद्यापीठ
 

Published On: Apr 05 2018 2:12AM | Last Updated: Apr 05 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणे स्मार्ट सिटीच्या पुढाकारने ‘रुफटॉप सौरऊर्जा’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठातील 14 इमारतींवर ‘रुफटॉप सौर ऊर्जा’ प्रकल्प उभारण्यासाठी ‘क्लीनमॅक्स एनव्हायरो एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ (विकासक) या कंपनीसोबत 25 वर्षांचा ऊर्जा खरेदी करार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्मार्ट सोलर विद्यापीठ होणार आहे. 

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने डिसेंबर 2017 मध्ये विद्यापीठ परिसरात पब्लिक बायसिकल शेअरिंग सेवा सुरु केली होती. ही योजना यशस्वीपणे राबविल्यानंतर पुणे स्मार्ट सिटीद्वारे विद्यापीठामध्ये ‘रुफ टॉप सौरऊर्जा’ प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी या क्षेत्रातील शासनाच्या पॅनेलवर असलेल्या एका कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यात आला आहे. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सेकी) वतीने सुरू करण्यात आलेल्या योजनेचा भाग म्हणून या प्रकल्पाची संकल्पना राबविण्यात येणार आहे. सुमारे 602 किलोवॉट अवर्स क्षमतेचा हा प्रकल्प असून, तो सेकीच्या रेस्को मॉडेलप्रमाणे सुरू करण्यात येणार आहे. याबाबतच्या करारावर 27 मार्च रोजी स्वाक्षरी करण्यात आली आहे. सरकारी संस्थांमध्ये अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर व्हावा हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.

विद्यापीठात राबविण्यात येणारा हा सौर उर्जा प्रकल्प हा पुण्यातील हा अद्वितीय असा हा प्रकल्प आहे. एका नव्या पैशाविना विद्यापीठ सोलार बनणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही. विकसक कंपनी हा संपूर्ण 3.2 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार असून, त्याचे संचलन व देखभाल 25 वर्षांच्या काळासाठी करणार आहे. या प्रकल्पातून 600 किलो वॉट अवर्स एवढी स्वच्छ ऊर्जा निर्मिती होणार आहे. हे प्रमाण विद्यापीठाच्या दरमहा एकूण ऊर्जा वापराच्या 10 टक्के एवढे आहे. या ऊर्जेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 3.62 प्रति युनिट एवढा अनुदानित दर देईल, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. 

Tags : Pune, University Pune, Solar, University