होमपेज › Pune › विद्यापीठ मैदान, की उकिरडा! 

विद्यापीठ मैदान, की उकिरडा! 

Published On: Jun 13 2018 1:34AM | Last Updated: Jun 13 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उभारलेला सेट अद्यापही मैदानात असल्याने विद्यापीठाचे मैदान विद्रुप झाल्याचे चित्र दिसून येत आहे. विद्यापीठाच्या मैदानात लावलेला सेट काढण्यासाठी प्रसंगी जेसीबी लावा, अशा स्पष्ट सूचना उच्च शिक्षण विभागाने विद्यापीठाला देऊनही अद्याप मैदानात सेट अर्धवट अवस्थेत तसाच आहे.

विद्यापीठाच्या मैदानात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या आगामी फुटबॉलवर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सेट उभारला होता. दरम्यान, विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे हित बाजूला सारून मैदानावर चित्रपटाचा सेट उभारल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत विद्यापीठ प्रशासनाला धारेवर धरत तत्काळ सेट काढण्याची मागणी केली होती. त्यातच विद्यापीठाने सेट लावण्यासाठी राज्य सरकार आणि उच्च शिक्षण संचालनालयाची परवानगीच घेतली नसल्याचे समोर आले होते. त्यावर उच्च शिक्षण विभागाने सेट हटविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. तसेच उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनीही विद्यापीठाला भेट दिल्यानंतर मैदानातील सेट काढण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते.

त्यानंतर विद्यापीठाने मंजुळे यांना सेट काढण्याबाबत वारंवार नोटिसा पाठविल्या होत्या; त्यानंतरही सेट ‘जैसे थे’ होता. त्यानंतर उच्च शिक्षण विभागाने प्रसंगी जेसीबी लावून सेट हटविण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. त्यावर विद्यापीठाने मैदानात उभारलेला सेट स्वतःहून हटविण्याचे काम सुरू केले असून, सेट हटविण्यासाठी येणारा खर्च दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली होती. मात्र, विद्यापीठाने ही घोषणा करून दीड महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप चित्रीकरणासाठी उभारलेला सेट विद्यापीठाच्या मैदानात तसाच अर्धवट अवस्थेत पडून आहे. 

सेटमुळे मैदानी खेळ बंद 

चित्रीकरणाच्या सेटमुळे गेल्या 8 महिन्यांपासून विद्यापीठाचे मैदान विद्यार्थ्यांना खेळण्यास उपलब्ध नाही. त्यातच सेट काढण्याचे काम संथ गतीने सुरू आहे. अर्धवट सेटमुळे विद्यापीठाचे मैदान विद्रुप झाले असून, ते खेळण्यायोग्य कधी होणार, तसेच मैदानावरील सेट काढण्याचे काम आणखी किती दिवस चालणार असा प्रश्‍न विद्यार्थी उपस्थित करीत आहेत.