Tue, Apr 23, 2019 21:55होमपेज › Pune › पालखी सोहळ्यासाठी विद्यापीठाचे व्यापक नियोजन

पालखी सोहळ्यासाठी विद्यापीठाचे व्यापक नियोजन

Published On: Jul 07 2018 1:36AM | Last Updated: Jul 07 2018 12:32AMपुणे : प्रतिनिधी 

पंढरीच्या भेटीसाठी पालखी सोहळ्यासोबत जाणार्‍या लाखो वारकर्‍यांच्या सेवेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे यावर्षी व्यापक नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या पर्यावरण संवर्धन राष्ट्रीय विद्यार्थी दिंडीद्वारे यंदा प्रथमच वारीमार्ग व परिसराचे शास्त्रीय सर्वेक्षण व संशोधन करण्यात येणार आहे. तसेच निर्मल वारी अभियान, सेंद्रिय खताची निर्मिती व शेतकर्‍यांना मोफत वितरण, विज्ञानदिंडी, स्वच्छ भारत अंतर्गत भारत समर इंटर्नशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच यावर्षी प्रथमच राष्ट्रीय दिंडीत 250, तर पालखी मुक्कामात वारकर्‍यांचे आरोग्यदूत म्हणून सुमारे 12 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, थं क्रियेटीव्हचे प्रशांत अवचट, अधिसभा सदस्य भागेश्री मंठाळकर आदी उपस्थित होते. 

यावेळी डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले,  स्वच्छता, प्लास्टिक व थर्माकोल मुक्त वारी, शौचालय वापराबाबत जनजागृती, पथनाट्याद्वारे वारीमार्गावरील 300 गावांमध्ये लोकजागरण, वापरलेल्या पत्रावळ्या व निर्माल्यसंकलनसाठी वारी कालावधीत उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदाची विद्यार्थी दिंडी लोकाभिमुख झाली असून त्यामध्ये उद्योगसमूह, शिक्षणसंस्था, सेवाभावी संस्था, आरोग्यसेवा, सरकारी यंत्रणा, अधिकारी, लोकसेवक सहभागी होत आहे. वारीमार्ग व परिसरातील 300 गावांमध्ये प्रत्येकी 15 विद्यार्थ्यांची 4 पथनाट्यपथके म्हणजे 60 विद्यार्थी हे 15 दिवस अभियानाचे महत्त्व पटवून देतील. त्याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, पर्यावरणीय व आरोग्यविषयक सर्वेक्षण, संशोधनप्रकल्प विद्यार्थी व प्राध्यापकांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे.