Mon, Sep 24, 2018 07:07



होमपेज › Pune › विद्यापीठ प्रशासन पेपर पाठवायला विसरले !

विद्यापीठ प्रशासन पेपर पाठवायला विसरले !

Published On: May 12 2018 1:31AM | Last Updated: May 12 2018 1:31AM



पुणे : प्रतिनिधी 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात एम.ए. द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. यामध्ये शहरातील एका महाविद्यालयात एम. ए. मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठीचा पेपर तब्बल सव्वा तास उशिरा मिळाला कारण विद्यापीठ प्रशासन हा पेपरच पाठवायला विसरले असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचा परीक्षेबाबतच्या ढिसाळ नियोजनाचा प्रकार पुढे आला आहे.

विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांच्या वेळापत्रकानुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नाशिक आणि नगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रांवर  ‘विशेष लेखकांचा अभ्यास - यशवंतराव चव्हाण (मध्ययुगीन आणि अर्वाचीन)’ आणि ‘विशेष लेखकांचा अभ्यास - जनाबाई (मध्ययुगीन आणि अर्वाचीन)’ असे दोन पेपर दुपारी तीन वाजता सुरू होणे अपेक्षित होते. यातील ‘विशेष लेखकांचा अभ्यास - जनाबाई’ या विषयाचा पेपर वेळेवर सुरू झाला. मात्र, ‘विशेष लेखकांचा अभ्यास - यशवंतराव चव्हाण’ या विषयाचा पेपर विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा सुरू होण्यापूर्वी ई-मेलद्वारे पाठविण्यात आला नाही. पेपर वेळेवर न आल्याने त्याची प्रिंटआउट काढून विद्यार्थ्यांना दिली नसल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये चर्चा सुरू झाली.

पेपर सुरू होण्याची वेळ झाल्यानंतर देखील विद्यार्थ्यांना पेपर मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली. याबाबत शहरातील एका महाविद्यालयाने परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाकडे विचारणा केल्यानंतर तब्बल सव्वा तासाने ई-मेलने पेपर पाठवला त्यानंतर तीन वाजता सुरू होणारा पेपर सव्वाचार वाजता सुरू करण्यात आला. विद्यार्थ्यांना पेपर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांची चलबिचल थांबली. या प्रकारात विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वाढवून दिल्याने त्यांचे नुकसान झाले नाही. दरम्यान, ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर आलेल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला आहे.

‘विशेष लेखकांचा अभ्यास यशवंतराव चव्हाण (मध्ययुगीन आणि अर्वाचीन)’ पेपरमध्ये काही चुका असल्याते लक्षात आल्यानंतर त्या सुधारण्यात वेळ गेला. पेपरच्या चुका दूर झाल्यानंतर साधारण चारच्या सुमारास तो ई-मेलद्वारे महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आला. त्यानंतर तो डाउनलोड करून विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी देण्यात आला. विद्यार्थ्यांचा वाया गेलेला वेळ वाढवून देण्याच्या सूचना केंद्रांना दिल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे नुकसान होणार नसल्याची सारवासारव मंडळाकडून करण्यात आली आहे.