Tue, May 21, 2019 00:10होमपेज › Pune › साखरेचा एसएमएस अन् एकांतात चर्चा!

साखरेचा एसएमएस अन् एकांतात चर्चा!

Published On: Jun 02 2018 2:03AM | Last Updated: Jun 02 2018 1:05AMपुणे : प्रतिनिधी

विविध विकासकामांवर चर्चा झाल्यावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार म्हणतात, काल साखरेबाबत आपला एसएमएस मिळाला... यावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आसपासच्या लोकांवर नजर फिरवत उठतात. चला आपण आत चर्चा करू! दोघांची सुमारे दहा मिनिटे काचेच्या दरवाजाआड चर्चा होते आणि दोघेही बाहेर येतात. ही चर्चा साखर कारखानदारीवर होती की ऊसदर, साखरेचे कमी-जास्त होणारे दर? यावर होती हे गुपितच राहते.

भाजप सरकारच्या चार वर्षांचा लेखाजोखा मांडण्यासाठी गडकरी शुक्रवारी पुण्यात आले असता पवार यांनी त्यांची भेट घेतली. वास्तविक गेल्याच आठवड्यात गडकरी यांनी पुण्यात घेतलेल्या बैठकीस पवार सुद्धा उपस्थित होते असे असताना गडकरी पुण्यात असल्याचे समजल्यावर पवार बारामतीहून पुण्यात आल्याने राजकीय भुवया उंचावल्या होत्या. पालघरच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू झालेल्या राजकीय युध्दानंतर ही भेट झाल्याने राज्यात राजकीय भूकंप होतो काय, अशाही वावड्या उठल्या. गंमत म्हणजे ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये ही चर्चा झाली तेथे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. मात्र, या चर्चेवेळी ते गैरहजर राहिल्याने किंतू निर्माण झाला होता. सुमारे तासभर झालेल्या चर्चेत एकही राजकीय अवाक्षर न काढता केवळ पुण्याच्या विकासावर चर्चा करीत या दोन्ही नेत्यांनी राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला.

पुरंदर विमानतळावर जाण्यासाठी नजीकच्या सर्व रेल्वे स्टेशनला जोडणारा मार्ग बनला पाहिजे, रिंग रोड आणि पालखी मार्गाचा गतीने विकास केला पाहिजे. रिंग रोडचे काम करताना घरांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न व्हावेत, बाधितांना चांगला मोबदला दिला जावा, अशी भूमिका पवार यांनी मांडली.

केवळ रस्तेच नको तर पुणे शहर ग्रामीण भागासह विमानतळाला मेट्रोमार्गे अधिक जलद जोडू, वारकर्‍यांचे पाय पोळू नये म्हणून पालखीमुक्कामाच्या ठिकाणी गवताचा रस्ता करु असा दूरगामी विचार गडकरींनी मांडला. पवार यांनी रिंगरोड आणि पालखीमार्गाबाबत काही प्रश्‍न उपस्थित केले. या कामामध्ये येणारे अडथळे, विलंब आणि नुकसानभरपाई याबद्दल चर्चा केली. गडकरी यांनी अधिकार्‍यांकडून कागदपत्रे आणि नकाशे घेऊन याबद्दलची माहिती दिली. पवार यांनी सुचविलेल्या मुद्यांची त्यांनी नोंद घेतली. त्यानंतर पवार यांनी पुरंदर विमानतळानजीकच्या रेल्वेस्टेनशचा नकाशाच  काढला. विमानतळाचे काम होताना नंतर कोणत्याही समस्या राहणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे असे सांगत सासवड, जेजूरी आणि हडपसर येथील रेल्वेस्टेशनपासून प्रवाशांना थेट प्रस्तावित पुरंदर विमानतळावर जाता यावे यासाठी थेट रस्ता करण्यात यावा, असे त्यांनी सुचविले. ही कल्पना उचलून धरत गडकरी यांनी कागद-पेन मागविले आणि पुण्यासह शहरानजीकची छोटी मात्र, दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाची शहरे मेट्रोमार्गे विमानतळाला जोडू अशी कल्पना उतरविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचना करुन आंतराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने ही योजना व्यवहार्य आहे का,  ते तपासण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 

एकूणच राजकारणाच्या पटलावर पन्नास वर्षे वावरणारे पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते अन् सत्तेतील दूरदृष्टी असणारे गडकरी अशी मोट जमल्याने उपस्थितांनाही विकासाच्या सत्ताधारी अन् विरोधक यांच्या अनोख्या व्हिजनचे दर्शन घडले.