Tue, Apr 23, 2019 18:25होमपेज › Pune › मसाज सेंटरमध्ये चालतात अनैतिक प्रकार 

मसाज सेंटरमध्ये चालतात अनैतिक प्रकार 

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:36AMपिंपरी : प्रतिनिधी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ‘स्पा’, मसाज ‘पार्लर’चे नव्याने ‘कल्चर’ सुरू झाले आहे. कामातून आलेला थकवा, तो मानसिक असो की शारीरिक कमी करण्यासाठी अशा या मसाज सेंटरची गरज भासू लागली आहे. शहरात ठिकठिकाणी मसाज सेंटर सुरू आहेत. मात्र, काही मसाज सेंटरमधून अनैतिक प्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे. मसाज सेंटरच्या नावाखाली खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी समोर आणले आहे. त्यामुळे शहरासाठी आणि समाजासाठी हा मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे.

चिंचवड गावातील ‘स्पा ग्लो’ या मसाज सेंटरवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी छापा टाकला. तेथून पोलिसांनी तीन सज्ञान मुलींची सुटका केली. यामध्ये दोन मुली नेपाळचा असल्याचे स्पष्ट झाले. अशाच प्रकारे यापुर्वी पिंपरी-चिंचवड परिसरात आणि पुणे परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविणार्‍या ‘स्पा’ वरती छापे टाकण्यात आलेले आहेत. तरी देखील दिवसेंदिवस शहरात ‘स्पा’ची संख्या वाढतच आहे. शहरामध्ये सर्वच भागात खुलेआम स्पा, मसाज सेंटर सुरु आहेत. सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेत सुरु असणार्‍या या ‘स्पा’कडे पोलिसांचे कानाडोळा होत आहे. 

कामगारनगरी, आयटी हब, शैक्षणिक संस्था आणि मोठे गृहप्रकल्प असलेल्या या पिंपरी चिंचवड शहरात देशाच्या सर्वच भागातील नागरिक वास्तव करत आहेत. त्यामुळे शहराची संस्कृती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. आयटी क्षेत्रात काम करणार्‍या तरुण-तरुणी आठवड्यातील पाच दिवसाच्या कामामुळे मानसिक तणावात असतात. त्यामुळे अशावेळी ताण तणाव कमी करण्यासाठी ‘स्पा’ मध्ये जाउन वेगवेगळ्या प्रकारचे मसाज करुन घेतात. याच बरोबर इतरही नागरिक याकडे वळाले आहेत. या मसाज सेंटरमध्ये पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची वेगवेगळी ‘पॅकेज ’ दिली जातात. एक तास ते दोन तास असा याचा कालावधी असतो.

या मसाज पार्लरच्या व्यवसायात मोठ-मोठे उद्योजक, प्रतिष्ठीत व्यक्तींनी गुंतवणूक केलेली आहे. तर शहरातील काही हॉटेल्समध्येही स्पा सुरु आहेत. स्पा, मसाज सेंटरचे खुळ हे दिवसेंदिवस वाढत आहे. मसाज पुरुष किंवा महिला यांच्याकडून केले जाते. विशेषतः महिलांना जास्त मागणी आहे. यामध्ये काम करणार्‍या महिला या परराज्यातील तर काही ठिकाणी परदेशातील आहेत. त्यामुळे त्याकडे ग्राहक आकर्षीत होत आहे. यातील अनेक स्पा, मसाज सेंटर हे प्रामाणिकपणे व कोणत्याही अनैतिक प्रकाराशिवाय सुरु आहेत. मात्र काही ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु आहेत.