Tue, Mar 26, 2019 20:00होमपेज › Pune › मदरशातून बेपत्ता मुले घरी सुखरूप

मदरशातून बेपत्ता मुले घरी सुखरूप

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 08 2018 12:44AMपुणे : प्रतिनिधी 

हडपसर भागातील सैयदनगर परिसरात असलेल्या मदरशातून अचानक गायब झालेल्या सहा मुलांनी, आई-वडिलांना भेटण्याच्या तीव्र इच्छेमुळे तेथून पलायन केल्याचे समोर आले आहे. ही मुले त्यांच्या घरी बिहार येथे सुखरूप पोहोचली. सहा मुले 3 जुलै रोजी बेपत्ता झाली होती. 

सहमद आसार उद्दीन रजा (वय 13), अन्नान महंम्मद आजाद शेख (वय 12), अहसान निजाम शेख (वय 15), शाहनवाज जमालुउद्दीन शेख (वय 16), अन्वारुल इसराइल हक (वय 13) आणि रिजवान आलम सलमुद्दीन शेख (वय 15) अशी बेपत्ता झालेल्या मुलांची नावे आहेत. ही सर्व मुले पुण्याहून रेल्वेने बिहारमधील त्यांच्या गावी पोहोचली. 

याबाबत सहायक पोलिस  निरीक्षक एस. आर. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधल्या खेडेगावातून सहाही मुले पुण्यातील मदरशामध्ये शिकण्यासाठी आली होती. त्यांच्या पालकांनी त्यांना पुण्यात सोडले आणि निघून गेले. त्यानंतर सायंकाळी मदरशातून शेजारच्या मैदानावर त्यांना खेळायला नेले होते. तेव्हा लघवीला जाण्याच्या बहाण्याने एक एक करून ही मुले मदरशामध्ये गेली होती.

यानंतर कोणालाही काहीही न सांगता सामान घेऊन ती तेथून निघून गेली. एकाच वेळी 6 मुले बेपत्ता झाल्याने मदरशामध्ये  खळबळ माजली होती. त्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र ही मुले शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घरी परतल्याचे त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले. या मुलांना घरच्यांची आठवण येत होती़ तसेच शहरातील वर्दळीचे वातावरण न आवडल्याने त्यांनी पळ काढला, असे त्यांनी सांगितले.