Sat, Jan 19, 2019 08:03होमपेज › Pune › निगडी परिसरातील कुख्यात गुंड गाडीत असल्याचे समजून गोळीबार

निगडी परिसरातील कुख्यात गुंड गाडीत असल्याचे समजून गोळीबार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

रावण सेना टोळीचाप्रमुख अनिकेत जाधव याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीप्रमुख सोन्या काळभोर गाडीत असल्याचे समजून त्या दिशेने गोळीबार करण्यात आला. मात्र, गोळ्या गाडीवर लागल्याने कोणी जखमी झाले नाही. यामध्ये सोन्या काळभोरचे दोन साथीदार जखमी असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. रात्री उशिरापर्यंत कोणीही तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात आलेले नव्हते. हा प्रकार निगडी आणि देहूरोडच्या हद्दीलगत रविवारी रात्री घडल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

अमित फार्निस आणि जीवन सातपुते हे दोघे जखमी झाले असल्याची चर्चा होती. रावण सेनेतील सदस्यांनी हा गोळीबार केला असण्याची शक्यता आहे. आकुर्डी, रावेत परिसरात दहशत माजविण्यासाठी टोळीचे वर्चस्व निर्माण होण्यासाठी रावण सेना आणि महाकाली, सोन्या काळभोर टोळ्यात स्पर्धा सुरू आहे. यातूनच आठ दिवसांपूर्वी रावण सेनेचा म्होरक्या सराईत गुंड अनिकेत राजू जाधव याचा खून झाला. महाकाली टोळीचा प्रमुख हनुमंत उर्फ हनम्या शिंदे याच्यासह चौघांना अटक करण्यात आलेली आहे. याप्रकरणी सोन्या काळभोर, अक्षय काळभोर, दत्ता काळभोर (सर्व रा. पंचतारानगर, आकुर्डी), जीवन सातपुते, बाबा फार्निस आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. 

रविवारी रात्री सोन्या काळभोर हा निगडी आणि देहूरोडच्या हद्दीलगत येणार असल्याची टीप रावण सेनेच्या सदस्यांना मिळाली. ते हत्यारे घेऊन त्या ठिकाणी पोहचले. काळ्या काचांच्या गाडीत सोन्या असल्याचे समजून गोळीबार करण्यात आला. गोळ्या गाडीला लागल्याने कोणी जखमी झालेले नाही. गोळीबार करणारे फरार झाले आहेत. मात्र याबाबत कोणीही देहूरोड, निगडी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंद नव्हती. आसपासच्या कोणत्याच दवाखान्यात पोलिसांना माहिती मिळालेली नाही. मात्र गोळीबार झाला असून दोन जखमी असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. या घटनेला पोलिस सूत्रांनी दुजोरा दिला आहे.