Tue, Apr 23, 2019 23:46होमपेज › Pune › बोलणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न : डॉ. महाजन

बोलणार्‍यांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न : डॉ. महाजन

Published On: Apr 10 2018 1:14AM | Last Updated: Apr 09 2018 11:31PMपिंपरी : प्रतिनिधी

मोगम घोषणा करायच्या लोकांना झुलवत ठेवायचं ही मोदी सरकारची कार्यपद्धती आहे. सरकारच्या फसलेल्या घोषणांच्या विरोधात बोलणारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरीब, दलित, अल्पसंख्यांक वर्गात दहशतीचे साम्राज्य निर्माण केले जात आहे. त्यामुळे देशद्रोहाचा आरोप करून आपल्याला तुरूंगात टाकले जाईल, याभीतीने अनेकजणांना ग्रासले आहे. या अशांततेतून देशाने बाहेर पडावे, यासाठी काँग्रेसने उपोषण हा आत्मक्‍लेशाचा मार्ग आज स्वीकारला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी येथे केले. 

देशात शांती आणि सलोखा धोक्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी (दि. 9)  दिल्‍लीतील राजपथावर उपोषणाला बसले होते. सकाळी दहा वाजल्यापासून त्यांच्या उपोषणाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसतर्फे राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालयासमोर एक दिवस उपोषण करण्यात येत आहे. पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या वतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या वेळी शहराध्यक्ष सचिन साठे, सेवा दलाचे संग्राम तावडे, माजी महिला प्रदेशाध्यक्षा श्यामला सोनवणे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी महापौर कविचंद भाट, तसेच विष्णूपंत नेवाळे, गौतम आरकडे, नरेंद्र बनसोडे, मयूर जैस्वाल, राजेंद्र वालिया आदी उपस्थित होते. 

या वेळी डॉ. महाजन म्हणाले की, दोन कोटी लोकांना रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रूपये जमा करू अशा घोषणा करून भाजपने सत्ता मिळविली. प्रत्यक्षात अनेक मतदानाच्या फक्त 31 टक्के मते त्यांना मिळाली, मात्र टक्केवारी व मिळालेल्या जागा यांची कधीच संगती नसते. त्यामुळे भाजपला सत्तेची संधी मिळाली  मात्र गेल्या तीन साडेतीन वर्षात दिलेली आश्‍वासने ते पूर्ण करू शकले नाहीत.

भाजपने काय केले असे विचारले की त्यांना राग येतो, काँगे्रसने साठ वर्षात काय केले असा प्रश्‍न ते रागाने करतात, मात्र काँग्रेसने केलेली कामे सांगयची म्हटले तर एक आठवडा ही पुरणार नाही. असे सांगून डॉ. महाजन म्हणाले की, अरूण जेटली, सुषमा स्वराज यांच्यावर दिल्लीत ज्या एम्स् रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती रुग्णालये काँग्रेसनी बांधली. ज्या टीव्हीचा वापर करून मोदींनी प्रचार केला. त्या टीव्हीचा प्रसार राजीव गांधी पंतप्रधान असताना झाला. राजीव गांधी यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने नेले. मोबाईला वापर त्यांच्याच काळात सुरू झाला.  एकेकाळी भारताला अन्नधान्य आयात करावी लागे, आज गहु, तांदूळ, साखर निर्यातीत भारत दुसर्‍या क्रमांकाचा निर्यातदार आहे. असे डॉ. महाजन म्हणाले. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून यासारख्या मोगम घोषणा देऊन सामान्यांना झुलवत ठेवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.

उत्तर प्रदेशात एक दलित तरूण घोड्यावर बसला म्हणून त्याला लोकांनी मारले, गो हत्या बंदीच्या नावाखालीही अनेकांना मारहाण केली गेली. ऍट्रासिटी कायद्यातील बदलास विरोध करत देशभर दलित संघटनांनी आंदोलन केले. सरकारला दहा दिवसांनी पुनर्विचार अर्ज करण्यास वेळ मिळाला, अशी टीका महाजन यांनी केली.

 

Tags : Pimpri, Pimpri news, Congress, Ratnakar Mahajan, hunger strike,