होमपेज › Pune › मंगरूळ-आंबळेला अशुद्ध पाणीपुरवठा

मंगरूळ-आंबळेला अशुद्ध पाणीपुरवठा

Published On: Jul 03 2018 1:54AM | Last Updated: Jul 02 2018 11:09PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

आंबी येथील इंद्रायणी नदीवरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मंगरूळ-आंबळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. विद्युत प्रणाली बंद असल्याने बहुतांश प्रक्रिया हातानेच करावी लागत असून, त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.आंदर मावळातील 16 गावांच्या सोयीसाठी 18 वर्षांपूर्वी इंद्रायणी नदीवर आंबी येथे ‘जॅकवेल’ बांधून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची प्रतिदिन एक दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेची मंगरूळ-आंबळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. सुरवातीस नवलाख उंबरे, जाधववाडी, बधालवाडी, दरेकर वस्ती, गोळेवाडी, मंगरूळसह इतर 16 गावांची तहान भागविणार्‍या या योजनेतून सध्या फक्त आंबी, गोळेवाडी, दरेकर वस्ती, एस्सार स्टीलसह मंगरूळ परिसरातील लोकवस्तीला पाणीपुरवठा होतो. मात्र. गेल्या अनेक वर्षांपासून प्राधिकरणाने प्रकल्पाची देखभाल अथवा दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे त्याची दुरवस्था होत चालली असून, पाण्याच्या शुद्धतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. 

तुरटी (आलम) मिसळण्याची यंत्रणा पूर्ण बंद आहे. अनेक वर्षापासून ड्रमद्वारे अनियंत्रित बाह्यमिश्रण चालू आहे. सेटलिंग बेसिन, फिल्टर आणि हायडेनमधील रेती आणि कोळशाचे थर अद्याप एकदाही बदलल्याचे दिसून येत नाही. ऊर्ध्वपतन गोल टाकीच्या टाइल्स आणि टाक्यांच्या साठवण पृष्ठभागावरील सिमेंट निघून गेल्याने पाणी गढूळ होत आहे. ब्लिचिंग पावडरच्या गोण्यांची मुदत संपत आली आहे. नियमावलीनुसार दर दोन दिवसांनी फिल्टर स्वच्छता केली जात नसल्याचा परिसरातील ग्रामस्थांचा आरोप आहे. चालू स्टँडबाय आणि स्पेअर या तीनपैकी एकच पंप कार्यान्वित असल्याचे दिसून येते. पटली दर्शक निकामी झाल्यामुळे ‘ओव्हरफ्लो’ कळत नाही; तसेच साठवण टाकी नसल्यामुळे पंप बिघडल्यास पाणीपुरवठा विस्कळित होतो. इमारतीची डागडुजी नसल्यामुळे मोकाट कुत्री, उंदीर यांचा मुक्त वावर याठिकाणी असतो. फिल्टर आणि पंप टाकीवरील डक्टला झाकणे नसल्यामुळे उंदीर तसेच कुत्रे पडून पाणी दूषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नादुरुस्त इलेक्ट्रिक स्टार्टर, बोर्ड आणि लोंबलेल्या उघड्या वायरी प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाची साक्ष देतात. केवळ एका कंत्राटी ऑपरेटरच्या भरवशावर चालणाच्या या केंद्राकडे वरिष्ठ अधिकारी महिनोंमहिने पाहत नाहीत. पाणीपट्टी थकल्याने आर्थिक तरतुदीअभावी, जलशुद्धीकरण केंद्राची देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता विजयकुमार मराठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.