Mon, Aug 19, 2019 00:41होमपेज › Pune › स्मृतिचिन्हावर महापालिका लोगोचा विनापरवाना वापर

स्मृतिचिन्हावर महापालिका लोगोचा विनापरवाना वापर

Published On: Aug 04 2018 1:35AM | Last Updated: Aug 04 2018 12:33AMपिंपरी : प्रतिनिधी

महापालिकेतर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्व कार्यक्रम निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात आयोजित केला आहे. कार्यक्रमात पालिकेचा लोगो विनापरवाना वापरून एका खासगी संस्थेतर्फे स्मृतिचिन्ह वाटप केले जात आहे. तसेच, कार्यक्रमात लोकशाहीर साठे यांनी लिहिलेल्या फकिरा ऐवजी  इतर पुस्तके भेट म्हणून दिली जात आहेत. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित खासगी संस्थेवर फौजदारी  कारवाईची मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 

सदर कार्यक्रम 1 ते 5 ऑगस्ट असे 5 दिवस सुरू आहेत. कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकार्‍यांचे नाव व छायाचित्र वापरून स्मृतिचिन्हावर पालिकेच्या लोगो विनापरवाना वापरला आहे. स्मृतिचिन्ह वाटपास पालिकेने बंदी घातली असताना असा प्रकार केला जात आहे. तसेच, लोकशाहीर साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाटप न करता इतर पुस्तकांचे वाटप केले जात आहे, अशी तक्रार साने यांनी केली आहे. एका खासगी संस्थेतर्फे पालिकेचा लोगो वापरून स्मृतिचिन्ह वाटप केले जात आहे. विनापरवाना लोगो वापरल्याने संबंधित संस्थेवर पालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी साने यांनी केली आहे. पालिका प्रशासनात समन्वय नसल्याने हे प्रकार घडत आहेत. ढिसाळ संयोजन केल्याबद्दल संबधितावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, या प्रकाराची तक्रार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अरुण जोगदंड, अनिल सौंदडे, नितीन घोलप, संदीप जाधव, संदीपान झोंबाडे, मनोज तोरडल आदींनी आयुक्तांकडे केली आहे.

महापुरुषांच्या नावाने राजकारण करू नये : एकनाथ पवार 
महापुरुषांची जयंती, उत्सव पालिकेने साजरे करू  नयेत, असे न्यायालयासह शासनाचे निर्देश आहेत; तरीही, महापुरुषांचे विचार नागरिकांप्रत पोहोचावेत म्हणून खासगी तत्त्वावर प्रबोधन विचार पर्व  सुरू आहे.  पालिकेकडून स्मृतिचिन्ह देण्याची परंपरा भाजपने बंद केली; त्यामुळे खासगी संस्थांकडून कार्यक्रमावर खर्च केला जात आहे. अनवधानाने पालिकेचे लोगो वापरून स्मृतिचिन्ह बनविले गेले. त्यासंदर्भात संबंधितांना समज दिली आहे, असे सांगून सत्तारूढ पक्षनेते पवार म्हणाले की, महापुरुषांच्या नावाने कोणीही पक्षीय राजकारण करू नये.