Sat, May 25, 2019 22:56होमपेज › Pune › चिखली मंडईत अनधिकृत शेड

चिखली मंडईत अनधिकृत शेड

Published On: Jul 19 2018 1:38AM | Last Updated: Jul 18 2018 10:45PMपूनम पाटील

चिखली मोरेवस्ती परिसरातील भाजीमंडईत काही विक्रेत्यांनी घुसखोरी करून अनधिकृत शेड उभारले असल्याची तक्रार येथील भाजी विक्रेत्यांनी केली आहे. मंडईत मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी भाजी विक्रेत्यांच्या प्रश्‍नांकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे चिखलीतील भाजीमंडईचा प्रश्‍न सुटण्याऐवजी चिघळत आहे. चिखली मोरेवस्तीमधील भाजी मंडईत 130 गाळे आहेत. मात्र गाळेवाटपात पक्षपात करण्यात आला असून, लोक प्रतिनिधींनी दिलेले आश्‍वासन अद्याप पाळलेले नाही. त्यामुळे भाजी विक्रेते नाराज आहेत. ही मंडई दोन भागात विभागली गेली असून जुन्या आणि नवीन भाजी विक्रेत्यांमध्ये एकमत नसल्याने भाजी मंडई वार्‍यावर असल्याची सद्यस्थिती आहे. मंडईच्या समस्या मांडण्यासाठी कुणीही अध्यक्ष नाही. अध्यक्ष कोण असे विचारल्यास ‘आम्ही सर्वच अध्यक्ष आहोत’ असे उद्दाम उत्तर ऐकायला मिळाले. 

सोयी-सुविधांचा ठणठणाट

मंडईत स्वच्छतेचा प्रश्‍न कायम असून मंडईबाहेरील कचराकुंडी ओव्हरफ्लो होऊन प्रवेशद्वाराजवळच अस्वच्छता पसरली आहे. मंडईत स्वच्छतागृह नाहीत. सीसीटिव्हीही बसवण्यात आलेले नाहीत. गेटवर सुरक्षारक्षक नाही.  मंडईतील छत गळत असून पत्राशेड कधी बांधून देणार, असा सवाल विक्रेत्यांनी केला आहे. 

परप्रांतीयांना गाळे विकल्याचा स्थानिकांचा आरोप

चिखली परिसरात आपण गेली कित्येक वर्ष भाजी विक्रीचा व्यवसाय करत असून ज्यांच्या हाती या भाजी मंडईची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत एकेकाला चार गाळे याप्रमाणे परप्रांतीयांनाच मंडईतील गाळे पन्नास ते साठ हजार रुपयाना विकले आहेत. मात्र जुन्या स्थानिक भाजी विक्रेत्यांनी वारंवार मागणी करुनही पन्नास ते साठ हजार रुपयांची मागणी करत गाळे देण्यास अडवणूक केली जात आहे, असा आरोप नव्याने भाजी मंडईत स्थलांतरीत झालेल्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.