Wed, Jul 17, 2019 20:45होमपेज › Pune › ‘प्लॉटिंग’साठी गायरानातून बेकायदा रस्ता

‘प्लॉटिंग’साठी गायरानातून बेकायदा रस्ता

Published On: Dec 26 2017 1:33AM | Last Updated: Dec 25 2017 11:54PM

बुकमार्क करा

लोणी काळभोर : प्रतिनिधी

आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे शिरूर हवेलीतील एका लोकप्रतिनिधीच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या बेकायदा प्लॉटिंगसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून शासकीय गायरान जागेतून बेकायदा रस्ता तयार केला असून जिल्हाधिकार्‍यांकडे गेल्या तीन महिन्यांपासून लेखी तक्रार करूनही महसूल विभागासह जिल्हाधिकारी कार्यालयाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या गायरान जागेतील बेकायदा रस्ता तातडीने बंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. 

आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे 40 एकराच्या जागेत मंगलमूर्ती वास्तू प्रा. लि. या कंपनीने ‘प्लॉटिंग’ करून जमीन विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या प्लॉटवर जाण्यासाठी दूरवरून रस्ता असून या रस्त्यावरून जर ग्राहकांना घेऊन गेले तर एकाही प्लॉटची विक्री होणार नाही हे हेरून या डेव्हलपर्सने जिल्हाधिकार्‍यांच्या अधिकारात असलेल्या शासकीय गायरानातून शासकीय परवानगी न घेता रस्ता केला आहे. या ‘प्लॉटिंग’शेजारी गायरान जागा असल्याने स्वतःच्या जागेतून पक्का रस्ता तयार न करता गायरान जागेतून डांबरीकरण करून पक्का रस्ता तयार केला आहे. तसेच या गायरान जागेत काही भाग डोंगराचा असल्याने रस्त्यासाठी डोंगरभाग पोखरला आहे.

‘प्लॉटिंग’साठी बेकायदा रस्ता खोदल्याची तक्रार काही ग्रामस्थांनी  जिल्हाधिकारी यांच्याकडे 20 सप्टेंबर रोजी केली होती. परंतु एवढा गंभीर विषय असूनही  जिल्हाधिकारी कार्यालयाने कोणतीही दाखल अद्याप घेतली नाही, अथवा हवेलीच्या तहसीलदारांनी कोणतेही पंचनामा अथवा पाहणी करण्याचे आदेश दिले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. एवढा मोठा गंभीर प्रकार का दाबला जातो याची खुलेआम चर्चा नागरिक करू लागले असून या प्लॉटिंग व्यावसायिकाचे  शिरूर-हवेलीतील एका लोकप्रतिनिधीशी जवळचे संबंध असल्याने महसूल प्रशासन हे प्रकरण दडपत असल्याची कुजबूज लोकांत चालू आहे.

परंतु महसूल यंत्रणेने अथवा जिल्हाधिकारी यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता शासकीय जमिनीची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. याविषयी हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 2012 च्या शासन नियमानुसार गायरान जागेचे संवर्धन ग्रामपंचायतीचे काम आहे. अतिक्रमण झाले असल्यास त्याकडे लक्ष देऊन महसूल यंत्रणेकडे तक्रार करावी व या प्रकरणाची माहिती घेऊन आमच्या यंत्रणेला चौकशी करण्याचे आदेश देत आहे.