Wed, Jul 24, 2019 14:28होमपेज › Pune › नाले सफाईत बिल्डर होतायंत मालामाल 

नाले सफाईत बिल्डर होतायंत मालामाल 

Published On: Jul 14 2018 12:56AM | Last Updated: Jul 13 2018 7:05PMपुणे : दिगंबर दराडे 

पावसाळी आला की, प्रशासनाकडून नालेसफाईची घाईगडबड सुरू असते. मात्र पुण्यातील उंड्री, पिसोळी, देवाची ऊरळी, हांडेवाडी, टिळेकरनगर परिसर याला अपवाद ठरत आहे. उलट याच नाले आणि ओढ्यांवर सर्रासपणे अनिधिकृत बांधकाम सुरू असल्याने या परिसरात बकालीकरण वाढत आहे.

पुण्यातील दक्षिण परिसराचा बांधकाम व्यावसायिकांकडून पर्यावरणाच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या परिसरातसरात असणाऱ्या नैसर्गिक ओढे-नाल्यावर बांधकाम व्यावसायिकांनी अनिधिकृत बांधकाम केले आहेत. यामुळे या नाल्यांचे अस्तित्व केवळ कागदावरच उरले असून, प्रत्यक्षात टोलेजंग इमारतींनी त्यांचे पात्र गिळंकृत केले आहे. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांना याचा कोणताच थांगपत्ता देखील नाही. यामुळे अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई झालेली नाही. या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

उंड्री, पिसोळी, देवाची ऊरळी, हांडेवाडी, टिळेकरनगर परिसरात टेकड्यांवरून नैसर्गिक ओढेनाले वाहत होते; परंतु गेल्या काही वर्षांत या परिसरात बांधकामे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे ओढे-नाले गायब केले आहेत. अस्तित्वात असलेल्या ओढे-नाल्यांवरही बांधकाम व्यावसायिकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. नकाशानुसार महापालिकेत कागदोपत्री ओढे-नाले दिसतात; परंतु प्रत्यक्ष जागेवर ते दिसत नाहीत. यामुळे ओढ्यात रस्त्यावरून येणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे पाणी तसेच साठून राहत असल्याने दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या भागात मोठा पाऊस झाला तर ओढ्याच्या परिसरातील बांधकामांना धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसून, माहिती घेऊन कारवाई करू असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तर संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. 

...ओढे नाले वाचवा

बांधकाम व्यवसायामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. ते वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अन्यथा शहारात ओढे नाले होते असे सांगण्याची वेळ आपल्यावर येईल.  -सचिन पुणेकर. पर्यावरण अभ्यासक

...त्या बांधकामावर कारवाई करणार

नाले बुजवून पूररेषेवर बांधकाम केल्याने पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते.  त्यामुळे नाल्यावर अनिधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. या बांधकामाबाबत सध्या चौकशी सुरू असल्याचे पुणे महानगर प्राधिकरण, आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.