Thu, Apr 25, 2019 23:35होमपेज › Pune › अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट

अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा सुळसुळाट

Published On: Jun 15 2018 1:06AM | Last Updated: Jun 15 2018 1:06AMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारीची परिवहन आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलबाबतच्या तक्रारीची सखोल चौकशी करून केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक परिवहन आयुक्त राजेंद्र शिंदे यांनी दिले आहेत.
वाढत्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाहन चालकांना शास्त्रशुद्ध ड्रायव्हिंग प्रशिक्षणाची गरज असून त्यासाठी ठिकठिकाणी ड्रायव्हिंग स्कूल चालवले जात आहेत. मात्र यातील अनेक ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत आहेत. 

अशा अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार यांनी परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई यांच्याकडे दि.1 नोव्हेंबर 2017 रोजी पत्र देऊन केली त्यावर परिवहन आयुक्तांनी दि.7 डिसेंबर 2017 रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी यांना याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मात्र पिंपरी आरटीओने या आदेशाला केराची टोपली दाखवली. 

पिंपरी चिंचवड मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कुंभार यांनी या विषयाचा पाठपुरावा सुरूच ठेवला. त्यामुळे राजेंद्र शिंदे, सहायक परिवहन आयुक्त (अंमल-2) परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांना नव्याने पत्र पाठवले आहे. 

याआधी 7 डिसेंबर 2017 रोजी अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूल बाबतच्या तक्रारीबाबत सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत आदेश देऊनही परिवहन आयुक्त कार्यालयाकडे अहवाल सादर केला नसल्याबद्दल या पत्रात नापसंती व्यक्त करण्यात आली आहे. 

अनधिकृत मोटार ड्रायव्हिंग स्कूलबाबतच्या तक्रारीची सखोल चौकशी करून केलेल्या कारवाईचा तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या सद्यःस्थिती बाबतचा अहवाल त्वरित सादर करावा असे आदेश सहायक परिवहन आयुक्त राजेंद्र शिंदे यांनी दिले आहेत.