Tue, Apr 23, 2019 07:35होमपेज › Pune › सिंहगड रोड भागात अनधिकृत फ्लेक्सचा विळखा

सिंहगड रोड भागात अनधिकृत फ्लेक्सचा विळखा

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 23 2018 10:34PMधायरी : मिलिंद पानसरे

सिंहगड रोड परिसरातील राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे खुर्द, आनंदनगर, माणिकबाग, वडगांव बुद्रुक फाटा, वडगांव उड्डाणपूल, धायरी फाटा, इत्यादी परिसरात कायमच रस्त्यावर अनधिकृत फ्लेक्सचा सुळसुळाट असतो. रस्त्यावर लावण्यात आलेल्या फ्लेक्स व बॅनर बाजीमुळे सिंहगड रस्त्याचे ऐतिहासिकपण नष्ठ होत चालले असून दिवसेंदिवस रस्त्याच्या व परिसराच्या विपुद्रीकरणात वाढ होत आहे.

वाढदिवस आला लावा फ्लेक्स, विविध संघटनांच्या व राजकीय पक्षांच्या नियुक्ती झाली की लावा फ्लेक्स, नेत्यांचे वाढदिवस आले की लावा फ्लेक्स अशी अवस्था सिंहगड रस्त्याची झालेली आहे. काही ठिकाणचे चौक तर कायमस्वरूपी फ्लेक्स लावण्यासाठी केंद्र स्थानचं झालेले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर व नागरिकांबरोबर अनेक छोटे मोठे व्यावसायिकही आपल्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी रस्त्यावरील विद्युत खांबांचा वापर करीत आहेत. 

या रस्त्यावरील फ्लेक्स बाजी करण्यासाठी कोणतीही महापालिकेची परवानगी देण्यात येत नाही. कधी तरी महापालिकेच्या वतीने या अनधिकृत फ्लेक्स वर कारवाई करण्यात येते. बॅनर काढून नेले जातात. परंतु फ्लेक्स लावण्यासाठी तयार केलेले पहाड रस्त्यावर डामाडौलात दुसरा फ्लेक्स लावण्याची प्रतीक्षा करीत असतात. हे अनधिकृत फ्लेक्स लावण्यासाठी आवश्यक असेलेली विविध खात्यांची व महापालिका आकाशचीन्ह विभागाची परवानगी घेतली जात नाही. काही ठिकाणच्या चौकात तर फ्लेक्स लावण्यासाठी  बाबूंचा पहाड उभा करून मोकळा सांगाडा तयार करून कायमच जागा रिझर्व करून ठेवल्याची परिस्थिती दिसत आहे. अनेक वेळा महापालिकेकडून कारवाई करण्यात येऊन फ्लेक्स बाजी करणार्‍यांवर व खाजगी व्यावसायिकांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली. 

जून अखेर शेवटचा गुन्हा महापालिका अतिक्रमण विभागाकडून दोघाजणांवर दाखल करण्यात आला होता.अशी माहिती पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. परंतु हे गुन्हे दाखल केल्यानंतर जामीनपात्र गुन्हा असल्याने कोणतीही कडक शिक्षा न्यायालयाकडून होत नाही. यामुळे आमच्यावर बिनधास्त गुन्हे दाखल करा असे फ्लेक्स बहाद्दर ठणकाऊन सांगत असल्याचे पुढे येत आहे. याकरिता प्रत्येकाने आत्मपरीक्षण करून परिवर्तन घडविण्याची गरज आहे. स्मार्ट सिटी कडे वाटचाल करणार्‍या पुणे शहराचे मात्र अनधिकृत फ्लेक्स मुळे विपुद्रीकरणात भरच पडत आहे.