Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Pune › प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीनीकरणासाठी भाजपात एकमत

प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीनीकरणासाठी भाजपात एकमत

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 11:09PMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करण्याबाबत भाजपमध्ये एकमत आहे. कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा भाजप शहराध्यक्ष आ. लक्ष्मण  जगताप यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.दिव्यांगांना साहित्य वाटप, मुद्रा बँक कर्जदारांचे संमेलनाची माहिती देण्यासाठी भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्‍नांना आ. जगताप, खा. अमर साबळे, आ. महेश लांडगे यांनी उत्तरे दिली.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी पिंपरीत एका कार्यक्रमात सांगितल्याने विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला. प्राधिकरणाच्या मालमत्तेवर डोळा ठेवून हे चालल्याचा आरोप केला गेला. भाजपमध्ये ही या विषयावर मतभेद असल्याची चर्चा आहे. याबाबत आ. जगताप यांना विचारले असता. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ‘पीएमआरडीए’मध्ये विलीन करण्याबाबत भाजपमध्ये एकमत आहे कोणतेही मतभेद नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. 

भाजपमधील वाद व महापालिकेच्या कारभारातील चुका याविषयी विचारले असता पक्षात कोणतेही वाद नाहीत.  झालेल्या चुकाही दुरूस्त केल्या जात आहे, असे आ. जगताप म्हणाले, गेल्या चार वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेला मंजुरी, स्मार्ट सिटीत शहराचा समावेश, अमृत योजने अंतर्गत ड्रेनेजच्या कामांसाठी साडेतीनशे कोटींचा निधी आदी कामे झाल्याचे जगताप यांनी सांगितले. दिव्यांग बंधूंना पेन्शनचे धोरण ठरले आहे. त्यांना दि.25 मे पासून फॉर्म वाटप केले जाईल. मतिमंदांना संभाळणार्‍यांना अर्थसहाय्य देण्याचे धोरण लवकरच ठरविले जाईल.

मुद्रा बँक योजना अद्याप लोकांपर्यंत पोहचली नसल्याचे निदर्शनास आणली असता लोकांनी तक्रारी केल्यास कारवाई केली जाईल. अर्थराज्य मंत्री शिवप्रताप शुक्‍ला यांना त्यासाठीच बोलावले आहे, असे खा. अमर साबळे यांनी सांगितले आहे. आपली राष्ट्रवादीशी जवळीक वाढली आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी आ. महेश लांडगे यांना विचारले असता ते म्हणाले की, कबड्डी असोसिएशनवर मी गेली दहा वर्षांपासून सदस्य आहे. कार्यकारिणींनी माझी निवड केली आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेत शरद पवार अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष आहे. तेथे आम्ही पक्षीय राजकारण बाजुला ठेवून खेळाडूंच्या विकासासाठीच काम करतो.या पत्रकार परिषदेस उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक विलास मडिगेरी, केशव घोळवे, माऊली थोरात, उमा खापरे, शैलजा मोळक आदी उपस्थित होते.