Wed, Jun 26, 2019 23:40होमपेज › Pune › विना परवाना आठवडे बाजाराचे पीक जोमात

विना परवाना आठवडे बाजाराचे पीक जोमात

Published On: Jan 11 2018 1:12AM | Last Updated: Jan 10 2018 11:02PM

बुकमार्क करा
पिंपरी : पूनम पाटील

गेली दोन वर्षे किंवा त्याहुन अधिक काळ चिंचवडसह शहरात आठवडे बाजार भरत आहेत. नागरीकांचा या आठवडे बाजारांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शेतकरी व ग्राहकहित लक्षात घेऊन आठवडे बाजार सुरू करण्यात आले होते. मात्र शहरात सुरू असलेले चार ते पाच आठवडे बाजार सोडले तर इतर आठवडे बाजार हे अनधिकृत-विनापरवाना असल्याची माहीती समोर येत आहे. 

शहरात गेली अडीच वर्षांपासून विनापरवाना आठवडे बाजार भरवून शेतकर्‍यांच्या नावाखाली आयोजकांनी लाखो रुपये कमावल्याचा आरोप शहरातील भाजी व्यावसायिक संघटनांनी केला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाकडून पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना पत्र दिले असल्याची माहीती देण्यात आली आहे.  पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी तीसपेक्षा अधिक आठवडे बाजार भरत आहेत.

मात्र त्यातील केवळ चार ते पाच आयोजकांनीच पनन मंडळाची पूर्वपरवानगी घेतली आहे. बाकी चिंचवडसह इतर ठिकाणी भरणारे आठवडे बाजार हे गेली अडीच वर्षे विनापरवाना अनधिकृतरीत्या सुरु आहेत,असा आरोप शहरातील भाजी व्यावसायिक संघटनांनी केला आहे. खासकरुन  पणन मंडळपुरस्कृत‘ अशी या आठवडे बाजारांची जाहिरात करण्यात येत असून शेतकरी बचत गटाच्या नावाखाली चिंचवडमधील आठवडे बाजार भरत असल्याचे शहरातील भाजी व्यावसायिक संघटनांचे म्हणणे आहे. महापालिकेने याबाबत आयोजकांना लेटर दिले असून त्यांच्यावर मात्र कारवाई होत नाहीे. तसेच शहरात आजमितीला किती आठवडे बाजार भरतात, याची माहीती महापालिकेच्या अधिकार्‍यांना नाही. शेतकर्‍यांच्या नावाखाली चालणार्‍या विनापरवाना आठवडे बाजारांवर कारवाई करावी अशी मागणी शहरातील भाजी विक्रेत्यांनी केली आहे.

चिंचवडसह संपूर्ण शहरात विना परवाना आठवडे बाजार भरत असून राजरोसपणे पणनमंडळाच्या परवानगीचा फलक असल्याचे फलक लावून आठवडे बाजाराचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे गेली अडीच वर्षे चिंचवडमधील आठवडे बाजारांना पनन मंडळाची परवानगी नसतांनाही खुले आम बाजार भरत आहेत. या बाजारातून दर दिवसाला भूई भाडे आकारुन आयोजक आर्थिक लाभ उठवत आहेत. महापालिकेने याबाबत कारवाई करावी. व फसवणूक करणार्‍यांवर कारवाई करावी,       -अतुल पडवळ, अध्यक्ष- अखिल चिंचवड भाजी मंडई

आठवडे बाजारासाठी जागेची मागणी महापालिकेकडे केली आहे. बाजारासाठी लागणार्‍या जागा महापालिका पनन मंडळाला हँडओव्हर करणार आहे. कागदपत्रांची पूर्तता करणे  बाकी आहेत. राधाबाई अ‍ॅग्रो फार्मा सोल्यूशनच्या वतीने सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे.     - चेतन दुधाळ,आयोजक, आठवडे बाजार, चिंचवड