Mon, Mar 25, 2019 05:18
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘डॉर्श’ कंपनीला 14 सप्टेंबर पर्यंतचा दिला ‘अल्टिमेटम’

‘डॉर्श’ कंपनीला 14 सप्टेंबर पर्यंतचा दिला ‘अल्टिमेटम’

Published On: Jul 02 2018 1:47AM | Last Updated: Jul 02 2018 1:06AMपुणे : दिगंबर दराडे

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सर्वंकष आराखडा (डीपीआर) तयार करण्याची जबाबदारी असलेल्या जर्मनीच्या डॉर्श कंपनीला 14 सप्टेंबरपर्यंतचा ‘अल्टिमेटम’ देण्यात आला असून, या मुदतीत डॉर्श कंपनीला हा डीपीआर द्यावा लागेल. बर्लिन, बँकॉक आणि कुवेत येथील विमानतळांचा सर्वंकष प्रकल्प आराखडा तयार करण्याचा अनुभव ‘डॉर्श’ला आहे. या कंपनीला पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, येत्या आठवडाभरात या विमानतळाच्या भूसंपादनाची अधिसूचना निघेल, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.  

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील राजेवाडी, वाघापूर, एखतपूर या परिसरातील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार ‘डीपीआर’ करण्याचे काम मागील सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून ‘डॉर्श’मार्फत सुरू आहे. अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने विमानतळाची अन्य कामे रखडली आहेत. त्यामुळे या कंपनीला ‘डीपीआर’चे काम पूर्ण करण्यासाठी 14 सप्टेंबरपर्यंत अखेरची मुदत देण्यात आली असल्याची माहिती काकाणी यांनी दिली.

 ते म्हणाले,  विमानतळ उभारणीच्या दिशेने वेगाने पावले टाकली जात आहेत. प्रशासनानेही या ठिकाणचा सर्व्हे केला आहे. पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, वनपुरी, कुंभारवळण आणि उदाचीवाडी अशा सात गावांच्या जागेत पुरंदर विमानतळ होत आहे. ‘डॉर्श’ कंपनीकडून जमिनींचे गट आणि सर्व्हे क्रमांक यांची छाननी सुरू आहे. याबरोबरच जमीन संपादनापूर्वी महसुली नोंदी अद्ययावत करणे, टायटल सर्च करणे, प्रत्यक्ष वहिवाट, सातबारा उतार्‍यांची प्रक्रिया पूर्ण करणे, ही कामे सुरू आहेत. विमानतळाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर विमानतळासाठीच्या जमीन संपादन प्रक्रियेच्या कार्यपद्धतीचे टप्पे निश्‍चित करण्यात येणार आहेत. या आठवड्यात भूसंपादनाची अधिसूचना निघेल, असा विश्‍वास काकाणी यांनी व्यक्‍त केला. 

जिल्हाधिकार्‍यांच्या अनुभवाचा फायदा होणार का?

संरक्षण विभाग व केंद्र शासनाच्या सर्व समित्यांकडून पुरंदर विमानतळासाठी गेल्या महिन्यातच सर्व मान्यता प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनाने पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा अध्यादेश जारी केला आहे. आता भूसंपादनाच्या अधिसूचनेची प्रतीक्षा आहे. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी औरंगाबाद येथे तातडीने समृध्दी महामार्गाचे भूसंपादन केले आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा पुरंदरकरांना होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

‘कर्‍हे’समोरच्या परिसरात धावपट्ट्या

या विमानतळावर सुमारे चार किमी लांबीच्या धावपट्ट्या तयार करण्यात येणार असून, त्यामुळे आसपासच्या कोणत्याही गावांना धक्का लागणार नाही, याची खबरादारी घेण्यात येणार आहे. जेजुरी ते सासवड या दरम्यान कर्‍हा नदीच्या समोरच्या परिसरात या धावपट्ट्या तयार होणार आहेत.