Tue, Jun 02, 2020 19:58होमपेज › Pune › शेळके खून प्रकरणात निकम विशेष सरकारी वकील  

शेळके खून प्रकरणात निकम विशेष सरकारी वकील  

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:28AMपुणे : प्रतिनिधी 

तळेगावचे माजी नगराध्यक्ष सचिन बाळासाहेब शेळके (38) यांचा गोळ्या घालून निर्घृण खून केल्याप्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने आता ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणार आहेत. या प्रकरणात आरोपींवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.  

गुरूदेव रमेश मराठे (28. रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे), बंटी ऊर्फ शंकर रामचंद्र दाभाडे (35), संदीप सोपान पचपिंड (30), खंडू ऊर्फ पप्पू दत्तात्रय पचपिंड (30), आकाश दीपक लोखंडे (21), रूपेश सहादू घारे (25), राजेश दादाभाऊ ढवळे (30), शिवाजी भरत आढाव (24),  अमित अनिल दाभाडे (23), सचिन लक्ष्मण ठाकर (26),  देवानंद ऊर्फ देविदास विश्वनाथ खर्डे, नितीन शिवाजी वाडेकर (22), दत्ता ज्ञानेश्वर वाघोले (22), सूरज विलास गायकवाड (22), अभिषेक ऊर्फ माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर मारुती गायकवाड, अजय राजाराम हिंगे, पिंट्या ऊर्फ बाळू दत्तात्रय सांडभोर (33), अमोल अनिल लांढे (21), मॉन्टी ऊर्फ संकेत जगदीश नानेकर, पंकज कृष्णाजी आवटे (28) यांच्यावर कट करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळीचा म्होरक्या शाम रामचंद्र दाभाडे, धनंजय प्रकाश शिंदे ऊर्फ तांबोळी यांचा मृत्यू झाला आहे.   

मृत श्याम दाभाडे हा सराईत गुन्हेगार असून, टोळीचा म्होरक्यादेखील होता. तर इतर गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी टोळीचे सदस्य आहेत. ही टोळी आर्थिक फायद्यासाठी संघटित होऊन गंभीर गुन्हे करण्याची सवय आहे. मृत सचिन शेळके यांचा तळेगाव एमआयडीसी परिसरात पाणीपुरवठा आणि खडी पुरवठा करण्याचा व्यवसाय होता. टोळीकडून शेळके यांच्याकडे हप्ता मागितला जात होता. परंतु, शेळके यांचा हप्ता देण्यास विरोध होता. तसेच ते टोळीलाही जुमानत नव्हते. 2013 मध्ये सचिन शेळके यांना पैशासाठी जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला होता.

याच कारणावरून श्याम दाभाडे याने आपल्या साथीदाराच्या मदतीने कट रचला. ते तळेगाव स्टेशन रस्त्यावरील खांडगे पेट्रोल पंपासमोर 16 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी अकराच्या सुमारास कारमधून जात असताना टोळीतील एकाने त्यांच्या कारला धडक दिली. यामुळे सचिन शेळके यांनी त्यांची कार थांबविली. त्यानंतर शेळके कारच्या बाहेर येताच त्यांना दांडक्याने मारहाण करून, धारदार हत्यारांनी वार करून तसेच गोळ्या झाडून त्यांचा निर्घृण खून केला होता. त्यानंतर आरोपी खून करून फरार झाले होते. या प्रकारणात शेळके यांच्या कुटुंबीयांच्या वतीने या प्रकरणात सरकार पक्षाकडून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्‍ती करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. निकम यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

 

Tags : pune, pune news, Sachin Shelke murder case, Ujjwal Nikam, Special Public Prosecutor,