होमपेज › Pune › पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढल्याने उद्धव ठाकरे चिंतेत

पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढल्याने उद्धव ठाकरे चिंतेत

Published On: Jul 23 2018 1:10AM | Last Updated: Jul 22 2018 10:54PMपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा खासदार असूनही या मतदारसंघात येणार्‍या पनवेलमध्ये सेनेऐवजी भाजपची ताकद वाढत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चिंतेत आहेत.  विधानसभेला सेनेच्या उमेदवाराला फक्त 17 हजार मते पडतात. पनवेल महापालिका निवडणुकीत आपल्याला एकही जागा जिंकता येत नाही हे दुर्दैव असल्याचे सांगत त्यांनी पुण्यात झालेल्या बैठकीत पदाधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे समजते. 

काँग्रेसचे माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांनी भाजपात प्रवेश केल्याने या पट्ट्यात भाजपची ताकद वाढली आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रशांत ठाकूर विजयी झाले. त्यांना 1 लाख 25 हजार 142 मते तर पीडब्लूपी चे बलराम पाटील यांना 1 लाख 11 हजार 927 मते मिळाली सेनेचे वासुदेव घरत यांना फक्त 17 हजार 953 मतांवर समाधान मानावे लागले.

मे 2017 मध्ये झालेल्या पनवेल महापालिका  निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला सोबत घेऊन शेकापने महाआघाडी केली.  भाजपला शिवसेना साथ देईल, असा विश्वास भाजपच्या ठाकूर यांना होता; मात्र युतीचे आमंत्रण देऊनही सेनेने ती स्वीकारले नाही. युती करावी की नाही यावरून सेनेत दोन गट पडले. युती झाल्यास जागा वाटपाबाबत एकमत होणार नाही, असे  चित्र होते. त्यामुळे युतीचा प्रस्ताव फेटाळण्याचाच निर्णय सेनेच्या  नेतृत्वाने घेतला. केंद्रीय मंत्री अनंत गीते हे भाजपच्या रामशेठ ठाकूर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगत होते.  तर दुसरीकडे उद्धव साहेबांचा शब्द अखेरचा असे राज्य सचिव आदेश बांदेकर यांनी सांगितले. खासदार गीते यांच्यामागे कोणताही नेता भाजपसोबतच्या सकारात्मक चर्चेसाठी उभा राहिला नाही. खासदार संजय राऊत, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वबळाचीच भाषा केली. 25 वर्षांनी पनवेलमध्ये शिवसेना स्वबळावर लढली. 

एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे सैनिक कामाला लागले मात्र या निवडणुकीत सेनेला साधे खाते खोलता आले नाही. 78 पैकी 51 जागा जिंकून भाजपने सत्ता संपादन केली. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीला 27 जागा मिळाल्या. यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पारड्यात प्रत्येकी दोन जागा पडल्या. एकूण मावळ मतदारसंघात येणार्‍या पनवेलमध्ये भाजपची वाढती ताकद सेनेसाठी डोकेदुखी ठरली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्ष पदाधिकार्‍यांच्या बैठकीत हीच खंत व्यक्त केली.  मावळात शिवसेनेचा खासदार असूनही विधानसभेला सेनेच्या उमेदवाराला फक्त 17 हजार मते पडतात. पनवेल महापालिका निवडणुकीत एकही जागा जिंकता येत नाही हे दुर्दैव असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  तुम्ही मला पनवेलसाठी एक नाव द्या त्या उमेदवाराला ताकदीने निवडून आणू असे ते म्हणाले. 

खा. श्रीरंग  बारणे अस्वस्थ

मावळात सेनेचा खासदार असूनही पनवेलमध्ये पक्षाची ताकद वाढत नसल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केल्याने खासदार श्रीरंग बारणे काहीसे अस्वस्थ झाले. पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढलेली नाही. तेथे राम शेठ ठाकूर यांची वैयक्तिक ताकद असून त्याचा भाजपला फायदा झाला आहे, असे सांगत खा. बारणे यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.