Wed, Mar 20, 2019 12:43



होमपेज › Pune › उदयनराजे, संभाजी राजेंनी आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड

'उदयनराजे, संभाजीराजेंनी आंदोलनाचे नेतृत्व करावे'

Published On: Jul 26 2018 1:38AM | Last Updated: Jul 26 2018 7:48AM



पुणे : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणासाठी करण्यात येत असलेले आंदोलन मराठा समाजाने शांततेत करण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, राज्य समन्वयक शांताराम कुंजीर आणि राज्य उपाध्यक्ष अजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. मराठा समाजाच्या आरक्षणासहित विविध मागण्यांबाबत राजकीय नेत्यांवर विश्‍वास राहिला नसल्याने खासदार उदयनराजे महाराज व खासदार संभाजी राजे यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व करावे, असे आवाहन दोघांनाही केले आहे. त्यांनी त्यावर विचार करुन आपला विचार सांगावा. मराठा समाजाला नक्‍कीच त्यांच्या नेतृत्त्वाचा फायदा होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले. 

राज्य शासनाच्या आदेशावरुन आतापर्यंत आंदोलन करणार्‍या पाच हजार आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी आकसाने गुन्हे दाखल केले आहेत. तसेच खुनाचा प्रयत्न या स्वरुपाचेही गंभीर गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. राज्य शासन अशा प्रकारे आंदोलन दडपण्यासाठी दंडेलशाहीचा वापर करीत आहे. ही राज्य शासनाची भूमिका चुकीची असल्याचे कुंजीर यांनी सांगितले.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनाविषयी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन करीत गायकवाड म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी विविध समाजाच्या विकासासाठी आरक्षण सुरू केल्याच्या घटनेला गुरुवारी (दि.26)116 वर्ष पूर्ण होत आहे. याचे महत्त्व महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात फार मोठे आहे. त्यामुळे शासनाने मागास वर्ग आयोगाला ठराविक वेळेमध्येच अहवाल सादर करण्याची अट टाकून त्याप्रमाणे त्वरित निर्णय घ्यावा.