Wed, May 22, 2019 20:42होमपेज › Pune › अखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर युनेस्कोचा करार

अखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर युनेस्कोचा करार

Published On: Dec 11 2017 5:51PM | Last Updated: Dec 11 2017 5:51PM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

सांस्कृतिक वैविध्य जपणे आणि युवा कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणे यासाठी युनेस्कोने अखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर अधिकृत भागीदारी केली आहे. पॅरीस येथे या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती, सांस्कृतिक संघाच्या अध्यक्षा रत्ना वाघ यांनी दिली आहे. जगभरातील एकूण 385 संस्था युनेस्कोशी जोडल्या असून, युनेस्कोने सांस्कृतिक क्षेत्रात भारतात प्रथमच भागीदारी केल्याचा दावाही वाघ यांनी केला.

पॅरिस येथे नुकत्याच पार पडलेल्या युनेस्कोच्या 39 व्या सर्वसाधारण सभेत अखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर भागीदारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. युनेस्कोच्या महासंचालक एरिना बोव्होको यांनी हा प्रस्ताव युनेस्कोच्या सदस्यांसमोर ठेवला. हा प्रस्‍ताव एकमताने मंजूर केल्याची घोषणा युनेस्कोचे उपमहासंचालक एरिक फॉल्ट यांनी केली.

युनेस्कोच्या भागीदारीमुळे सांस्कृतिक संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी अधिकृत दालन खुले झाले असून, संघाच्या कार्याला आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झाली आहे, असे सचिव हेमंत वाघ यांनी यावेळी सांगितले. एकमेकांच्या कलांची देवाणघेवाण, आंतरराष्ट्रीय स्पर्धा व महोत्सवांचे आयोजन आंतरखंडीय सांस्कृतिक, कला परिषदा व परिसंवादांचे आयोजन, भारतीय कलांचे जागतिक पातळीवर सादरीकरण, उभरत्या कलाकारांना विदेशी व्यासपीठ मिळवून देणे, सांस्कृतिक वैविध्य व वैश्‍विक संस्कृतीचे संवर्धन, कलाकारांचे व्यावसायिक सक्षमीकरण अशा अनेक उपक्रमांसाठी अखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर युनेस्कोने अधिकृत भागीदारी केली आहे. 

कला व सांस्कृतिक क्षेत्रात अखिल भारतीय सांस्कृतिक संघाने मागील 13 वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन युनेस्कोने या कार्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी युनेस्कोचे नवी दिल्ली येथील विभागीय कार्यालय व केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सांस्कृतिक संघाच्या नावाची शिफारस करण्यात आली.