Wed, Apr 24, 2019 19:30होमपेज › Pune › आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरूच

आरटीई प्रवेश नाकारण्याचे प्रकार सुरूच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पुणे : लक्ष्मण खोत 

बालकांचा मोफत शिक्षण हक्‍क कायद्यानुसार आर्थिक दुर्लभ घटकांतील 25 टक्के विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो. मात्र, शहरात मुजोर शाळांद्वारे ‘आरटीई’अंतर्गत करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचे प्रकार सर्रास सुरूच असल्याचे समोर आले आहे. सोमवारी (दि. 2 एप्रिल) शहरातील सुमारे 3 शाळांविरोधात पालकांनी प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी महापालिका शिक्षण विभागाकडे दाखल केल्या. त्यामुळे खासगी इंग्रजी शाळांची मनमानी सुरूच असून, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांनीही त्या जुमानत नसल्याचे समोर आले आहे.

शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येतो. त्याअंतर्गत राज्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यावर्षी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश नाकारण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यातच सरकारची उदासीनता शिक्षण विभागाची कारवाईस टाळाटाळ यामुळे शाळांची मुजोरी वाढली असून, पालकांना अरेरावीची भाषा करीत विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात आहेत. 

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेश नाकारताना पालकांना वेगवेगळ्या मार्गाने त्रास देत आहेत. पालकांना वेगवेगळी कारणे देत आहेत. यामध्ये आवश्यक कागदपत्रे जमा केली नाहीत, पाल्याचा वास्तव्याचा पत्ता शाळेपासून दूर आहे, ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश दिल्यास वेगवेगळ्या उपक्रमाची मिळून पालकांकडून हजारो रुपये शुल्क वसूल करण्यात येत आहे. दरम्यान, याविरोधात शाळांविरोधात शिक्षण विभागाकडे तक्रार केल्यास शाळांवर कोणतीही कारवाई होत नसून, अशा शाळांवर कोणतेही निर्बंध राहिले नसल्याची खंत पालक व्यक्‍त करीत आहेत. 

ट्री हाऊस हायस्कूलकडून 10 हजारांची मागणी 

‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळांना कोणतेही शुल्क आकारता येत नाही. दरम्यान, कात्रज-कोंढवा रोडवरील ट्री हाऊस शाळेद्वारे पालकांकडून पुस्तके, गणवेश आणि इतर उपक्रमासाठी 10 हजार रुपये शुल्क भरण्यासाठी तगादा लावण्यात येत असल्याची तक्रार पालकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. संबंधित शाळेद्वारे आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या 5 पालकांनी याबाबत तक्रार शिक्षण विभागाकडे दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत पालकांवर कोणतीही सक्ती करण्यात आली नाही. पालकांना फक्‍त गणवेश, शूज आणि पुस्तकांची किंमत सांगण्यात आली आहे, अशी माहिती शाळेचे प्रशासक लाल मोहन प्रधान यांनी दिली. 

निकोस स्कूलने प्रवेश नाकारला

कोंढवा येथील निकोस स्कूलद्वारे विद्यार्थाला प्रवेश नाकारल्याचा तक्रार पालक मुज्जफर दलाल यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. याबाबत मुज्जफर दलाल म्हणाले की, शाळेत प्रवेश घेण्यासाठी जाताना ‘आरटीई’अंतर्गत आवश्यक कागदपत्रे घेऊन गेलो होतो. दरम्यान, शाळेद्वारे प्रवेश घेताना ‘आरटीई’अंतर्गत आवश्यक कागदपत्रांच्या व्यतिरिक्त कागदपत्रांची मागणी करण्यात आली. त्यावेळी शाळेच्या लक्षात आणून दिले ही कायद्यानुसार ही कागदपत्रे आवश्यक आहेत. त्यावर शाळेच्या प्राचार्यांनी जोपर्यंत शाळेला आवश्यक कागदपत्रे आणणार नाही. तोपर्यंत प्रवेश देण्यात येणार नाही, अशी भूमिका घेत प्रवेश नाकारला. शाळेद्वारे पाल्याच्या रक्त गटासंदर्भात माहिती देणारे कागदपत्र पालकांकडून मागण्यात आले होते. दरम्यान, त्यानंतर शाळेला सर्व कागदपत्रे देऊनही प्रवेश देण्यात येत नाही, अशी माहिती दलाल यांनी दिली. 

पालकाच्या गैरव्यवहारामुळे प्रवेश नाकारला : शाळेची माहिती

दरम्यान, सबंधित पालकांने कागदपत्रे देण्याऐवजी स्टाफसोबत अरेरावी केली. आवश्यक कागदपत्रे देण्याची मागणी केली असता शाळेच्या महिला स्टाफसोबत गैरव्यवहार करण्यास सुरूवात केली. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देण्यात आला नाही. असे शिक्षण विभागाला इ-मेल द्वारे कळविण्यात आले आहे, अशी महिती शाळेच्या प्राचार्या नसिम आलम यांनी दिली. 

वास्तव्याचा पुरावा आईच्या नावाने असल्याने प्रवेश नाकारला

औंध येथील डीएव्ही पब्लिक स्कूलद्वारे विद्यार्थ्याला ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेताना वास्तव्याचा पुरावा म्हणून पाल्याच्या आईच्या नावाने असलेले प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, प्रवेश घेताना वडिलांच्या नावाने सर्व आवश्यक कागदपत्रे आवश्यक असल्याचे सांगून शाळेद्वारे प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविरोधात संबंधित पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वडिलांच्या नावाने असलेली कागदपत्रेच जोडावीत, असे कोठेही कायद्यात नमूद नाही. त्यामुळे शाळा मनमानी करत असल्याचा आरोप पालक प्रज्ञा अमर घरडे यांनी केला आहे.


  •