Thu, Jul 18, 2019 12:23होमपेज › Pune › भरारी पथकांची अनास्था; कॉपीबहाद्दर निघाले सुसाट

भरारी पथकांची अनास्था; कॉपीबहाद्दर निघाले सुसाट

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 12:49AMपुणे : गणेश खळदकर 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेतील इंग्रजीचा पहिलाच पेपर बुधवार, दि.21 रोजी सुरू झाल्यानंतर दीड तासाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे पेपर व्हायरल होण्याची गेल्या तीन वर्षांची परंपरा या वर्षी देखील कायम राहिल्याचे दिसून आले. याला भरारी तसेच बैठे पथकांचा हलगर्जीपणाच जबाबदार असून, त्यांना परीक्षेच्या गांभीर्याचा विसर पडला आहे. त्यामुळेच बारावी परीक्षेत गैरप्रकार घडत असून कॉपीबहाद्दर सुसाट सुटले आहेत. तर शिक्षण मंडळ मात्र गैरप्रकार रोखण्यात अपयशी ठरत असल्याची माहिती भरारी पथकांमध्ये यापूर्वी काम केलेल्या सूत्रांनी दिली आहे.

बारावी परीक्षेसाठी विद्यार्थी वर्षभर दिवस-रात्र अभ्यास करीत असतात. परंतु परीक्षांदरम्यान होणार्‍या गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यामुळे असे प्रकार होऊच नयेत यासाठी मंडळाकडून राज्यात भरारी तसेच बैठी पथके तैनात करण्यात येतात, परंतु या पथकांकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे परीक्षेदरम्यान होणार्‍या गैरप्रकारांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

यासंदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथकांमध्ये सहा ते सात व्यक्ती असतात. राज्य मंडळाचे, प्राथमिक संचालनालयाचे, माध्यमिक संचालनालयाचे तसेच अन्य पथके परीक्षेदरम्यान तयार करण्यात येतात. भरारी पथकांमध्ये निवड होणे हा निवड झालेल्या व्यक्तीला स्वत:चा बहूमान वाटतो. त्यामुळे मिळणार्‍या मानधनाचा विचार न करता ते भरारी पथकांंमध्ये सहभागी होतात. परंतु, या भरारी पथकांचे प्रमुख मात्र त्यांना अनेकवेळा मानधनच देत नाहीत तर कधी कधी भरारी पथकातील व्यक्तींचीच गाडी वापरतात. त्यामुळे भरारी पथकातील लोक देखील गांभीर्याने काम करीत नाहीत. तसेच ग्रामीण भागातील संवेदनशील केंद्रावर राजकीय दबावापोटी काम करताना अडचणी निर्माण होतात.

तसेच ज्या केंद्रावर भेट द्यायची असते. त्याची अगोदरच माहिती त्या केंद्रांना देण्यात येते. त्यामुळे अनेक केंद्रावर केवळ नावाला तुटपुंजी कारवाई करण्यात येते. याचा त्रास प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना होतो. परंतु याचे गांभीर्य भरारी पथके तसेच मंडळातील पदाधिकार्‍यांना असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळेच विविध उपाययोजना करून देखील परीक्षांदरम्यान होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यात मंडळ अपयशी असल्याचे दिसून येत आहे.