Wed, Nov 14, 2018 01:37होमपेज › Pune › स्वारगेट एसटी आरक्षण केंद्रात आता दोन खिडक्या

स्वारगेट एसटी आरक्षण केंद्रात आता दोन खिडक्या

Published On: May 01 2018 1:22AM | Last Updated: May 01 2018 1:04AMपुणे : प्रतिनिधी 

स्वारगेटच्या एसटी आरक्षण केंद्रात आता दोन तिकीट खिडक्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सोय होणार असून लांबलचक रांगांपासून त्यांची सुटका होणार आहे. मध्यंतरी दोन तिकीट खिडक्या उपलब्ध असूनदेखील एक तिकीट खिडकी कायमच बंद असायची. कर्मचारी उपलब्ध नसल्याने ती बंद ठेवण्यात आल्याचे एसटीच्या वतीने सांगण्यात येत होते. दरम्यान, ‘एकाच तिकीट खिडकीमुळे प्रवाशांचा वेळ जातो वाया’ या आशयाचे वृत्त दै. ‘पुढारी’ने दि. 20 मार्च रोजीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. 

या वृत्तामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून दुसरी तिकीट खिडकी उपलब्ध करण्यात आली असून प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. सध्या सुटीचा हंगाम असून स्वारगेट एसटी स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी होताना दिसत आहे. दुसर्‍या आरक्षण खिडकीमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांना तिकीट वेळेत उपलब्ध होऊ शकेल. दरम्यान, स्वारगेट येथील आरक्षण केंद्राची रचना लवकरच बदलण्यात येणार असून आता ज्या ठिकाणी आरक्षण खिडक्या आहेत, त्याच्याविरुद्ध दिशेला नवी व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे तीन तिकीट खिडक्या ठेवल्या जाणार आहेत, अशी माहिती एसटीच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे. 

Tags : Pune, Two, windows, Swargate, ST, reservation, center