Wed, Jul 24, 2019 06:24होमपेज › Pune › सत्तर वर्षांच्या आजी हौसेसाठी शिकल्या दुचाकी!

सत्तर वर्षांच्या आजी हौसेसाठी शिकल्या दुचाकी!

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 12:43AMपिंपरी : वर्षा कांबळे

हौसेला मोल नसते हेच खरे. विशिष्ट वयात एखादी हौस पूर्ण झाली नाही तर अनेकजण तो विचारच सोडून देतात. उतरत्या वयात घर आणि नामाचा जप करणे या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही, अशी भावना असते. मात्र, या भावनेला छेद देत शाहूनगर येथे राहणार्‍या शशिकला ढवळे यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी हौस म्हणून दुचाकी शिकल्या. नऊवारी साडीतील दुचाकी चालविणार्‍या ढवळे आजी आता सर्वांसाठीच कौतुकाचा विषय ठरत आहेत. 

उतारवयात घरातील एखाद्या व्यक्तीने असे काही करायची इच्छा जरी व्यक्त केली तरी आता या वयात तुला कशाला असे उद्योग पाहिजेत म्हणून दटविणारे नातेवाईक आपण पाहतो. परंतु, शशिकाला ढवळे यांनी दुचाकी शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर त्यांच्या घरच्यांनीही तितकाच पाठिंबा दिला. आता त्या पूर्ण आत्मविश्‍वासाने दुचाकी चालवू शकतात. आजींनी तरुण वयात त्यांच्या पतीबरोबर स्वत: बैलगाडी देखील चालविली आहे.

मूळच्या नगर जिल्ह्यातील ढवळे आजी पोटा-पाण्यासाठी 1984  मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये आल्या. त्यांचे पती बैलगाडीने शहरातील एमआयडीसीमध्ये मालवाहतूक  करण्याचे काम करीत होते. त्यांच्याकडे दोन बैलगाड्या होत्या. एका बैलगाडीवर त्यांचे पती आणि दुसर्‍या बैलगाडीवर गडी होता; मात्र काही कारणास्तव गडी कामावर न आल्याने माल वेळेत पोहचविण्याची परवड व्हायला लागली. तेव्हा त्यांच्या पतीने आजींना बैलगाडी चालविण्यास शिकविले. त्याकाळात देखील आजी शहरात एकमेव महिला बैलगाडी चालक असाव्यात.
त्यांनतर आजींनी केएसबी चौकात फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला. जवळपास अठरा वर्षे त्या फळविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. नऊवारीची साडी आणि  डोक्यावर पदर अशा दिमाखात आजी जेव्हा दुचाकी चालवितात तेव्हा बघणार्‍यांच्या माना वळल्याशिवाय राहात नाहीत.