Sun, May 26, 2019 20:42होमपेज › Pune › जप्त केलेली दोन वाहने वाळूमाफियांनी पळविली

जप्त केलेली दोन वाहने वाळूमाफियांनी पळविली

Published On: Jan 12 2018 1:55AM | Last Updated: Jan 12 2018 1:03AM

बुकमार्क करा
यवत : वार्ताहर

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या 13 वाहनांवर बुधवारी (दि. 10) रात्री यवत परिसरात पुरंदर महसूल विभागातर्फे कारवाई करण्यात आली. ही वाहने महसूल विभागाने ताब्यात घेतली आहेत. यवत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे ही वाहने नेण्यात येत असताना यातील दोन वाहने पळवून नेेली आहेत. याप्रकरणी संबंधितांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले  आहेत. 

दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी संजय असवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. दौंड तालुक्यात स्थानिक महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळू उपसा व वाहतूक करणार्‍या माफियांवर कारवाई करताना मर्यादा येत आहेत. कारण स्थानिक महसूल विभागाचे काही जण वाळूमाफियांना सामील आहेत; त्यामुळे कारवाईपूर्वीच वाळूमाफियांना कारवाई होणार असल्याबाबतची माहिती मिळते. परिणामी वाळूमाफिया ‘ट्रॅप’ होण्याऐवजी महसूलचे पथकच ‘ट्रॅप’ होत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी यांनी बुधवारी (दि. 10) रात्री थेट पुरंदर महसूल पथकावर ही जबाबदारी सोपवली.

त्यांनी पुणे सोलापूर महामार्गवर केडगाव, चौफुला ते यवतदरम्यान गस्त घालत सुमारे 13 वाहने ताब्यात घेतली होती. बाहेरील पथकाचा अंदाज न आल्यामुळे कारवाई करणे सोपे बनले आहे. कारवाईतून बचाव करण्यासाठी वाळूमाफिया विविध प्रकारच्या ‘शक्कल’ लढवत असतात. यात महसूल विभागाच्या वाहनाचे लोकेशन ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून सर्वांना कळवणे; तसेच वाहने जागेवर पोचण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवणे, वाहन पकडल्यानंतर ठराविक बटण वापरून वाहन जागेवर बंद करणे; त्यामुळे यावर आता महसूल विभागदेखील आक्रमक झाला आहे.