होमपेज › Pune › पालिकेचे दोन उपअभियंते निलंबित

पालिकेचे दोन उपअभियंते निलंबित

Published On: Jun 26 2018 1:15AM | Last Updated: Jun 26 2018 12:52AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात गुरूवारी (दि.21) झालेल्या वादळी पावसाळ्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून नद्याचे स्वरूप आले होते. या काळात निष्काळजीपणा दाखवून कर्तव्यात कसूर केल्याने महापालिकेच्या दोन उपअभियंत्यांवर सेवा निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. तसा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पारित केला आहे.

‘ग’ क्षेत्रीय कार्यालयात पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागातील उपअभियंता किशोर सोपान महाराज व स्थापत्य विभागाचे उपअभियंता विजयकुमार चंद्रभान काळे असे त्याचे नाव आहे. वादळी पावसाळ्यामुळे थेरगाव, बेलठिकानगर, गणेशनगर (जुना वॉर्ड क्रमांक 23 व 24) या भागांत पाणी साचल्याने रस्त्याला नद्याचे स्वरूप आले होते. तसेच, हाउंसिग सोसायट्या व घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच, वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. या संदर्भात ‘पुढारी’ने शुक्रवारी (दि.22) ‘गटाराची सफाई न झाल्याने शहरातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप; पालिका प्रशासनाचा ‘सफाई’चा दावा पहिल्याचा पावसात फोल; वाहनचालक व पादचार्‍यांच प्रंचड गैरसोय’ या शीर्षखाली छायाचित्रासह ठकळ वृत्त प्रसिद्ध केले होते. 

त्यांची दखल घेत आयुक्त हर्डीकर यांनी दोन उपअभियंत्यांचे निलंबन केले आहे. तसा आदेश शुक्रवारी (दि.22) जारी करण्यात आला आहे. संबंधित क्षेत्रातील पाणीपुरवठा, जलनिस्सारण व स्थापत्यविषयक कामाची जबाबदारी या दोघांवर सोपविण्यात आली होती. त्यापार्श्‍वभूमीवर आयुक्त दालनांमध्ये शुक्रवारी (दि.22) आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीस हे दोन्ही अधिकारी उपस्थित नव्हते. किशोर महाजन हे 2 ते 15 जून या कालावधीत वैद्यकीय रजेवर होते. त्यानंतर ते कामावर रूजू झाले नाहीत. विजयकुमार काळे यांनी कार्यालयास कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा संमती न घेता 20 जूनपासून विनापरवाना गैरहजर राहिले. तसेच, दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद दिला नाही. विनापरवाना गैरहजर राहून आपत्ती व्यवस्थापन कामात निष्काळजीपणा दाखवून नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाल्याची जबाबदारी त्यांच्यावर क्षेत्रीय अधिकार्‍याच्या अहवालात नमूद केली आहे. त्यानुसार संबंधित दोन्ही अधिकार्‍यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 मधील 3 नुसार कर्तव्याप्रती नितांत सचोटी राखलेली नसून कर्तत्यपरायणता न राखल्याने त्याच्यावर सेवा निलंबणाची कारवाई आयुक्तांनी केली आहे.