Sat, Apr 20, 2019 10:26होमपेज › Pune › मुंढव्यात दुमजली इमारत कोसळली

मुंढव्यात दुमजली इमारत कोसळली

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 12:44AMपुणे/ मुंढवाः प्रतिनिधी 

मुंढवा येथील केशवनगर परिसरात ओढ्याच्या बाजूला असलेली दुमजली इमारत शनिवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगार्‍याखालून नऊ जणांना स्थानिक व अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले, तर ढिगार्‍याखाली इमारतीच्या तळमजल्यात अडकलेल्या दोन गाई आणि दोन म्हशी जिवंत बाहेर काढल्या; मात्र तीन म्हशी ढिगार्‍याखाली दबून मृत्युमुखी पडल्या. 

सुभाष भांडवलकर (60, मुंढवा), छाया भांडवलकर (22), अरुणा भांडवलकर (40), अन्वी सुरज भांडवलकर (1 वर्ष), साक्षी शितखल (12 वर्षे), स्वरा शितखल (3 वर्षे), आदित्य मौर्य (5 वर्षे), पूनम मौर्य (8), विनिता रामसुरज मौर्य (30 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. इमारतीच्या मालकांचे कुटुंब व दोन भाडेकरू असे एकूण नऊ जण जखमी झाले. 

सविस्तर वृत्त असे की, सुभाष अबू भांडवलकर यांच्या मालकीची केशवनगर येथील संभाजी चौक सर्व्हे नं. पाच येथे ओढ्याच्या बाजूला दुमजली इमारत आहे. भांडवलकर कुटुंब आणि भाडेकरू मौर्य यांचे कुटुंब येथे भाड्याने राहात होते. या इमारतीच्या तळमजल्यावर गायी-म्हशींचा गोठा आहे. शनिवारी नेहमीप्रमाणे घरातील पुरुष मंडळी बाहेर गेलेली होती. त्यानंतर ओढ्याच्या बाजूला असलेली या इमारतीची भिंत पडली. क्षणात संपूर्ण इमारतच कोसळली. यामध्ये भांडवलकर व मौर्य कुटुंबातील सुमारे नऊ लोक व गोठ्यात बांधलेल्या पाच म्हशी व दोन गाई ढिगार्‍याखाली अडकल्या होत्या.  इमारत कोसळल्याचे शेजारी राहणार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर काहींनी या घटनेची माहिती अग्निशमन दल व पोलिसांना  दिली. तेही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.  

जवानांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्या नऊ जणांना सुखरूप बाहेर काढले; तसेच दोन म्हशी व गायींना वाचवण्यात यश आले. दोन जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.